लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : लॉकडाऊन काळात सुमारे ३ महिने एसटीची सेवा बंद राहिल्याने राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे. तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने आता मालवाहतूक सुरू केली असून आगाराने शनिवारी (दि.२०) मालवाहतुकीचा शुभारंभ केला.लॉकडाऊन काळात सर्वच प्रवासी वाहतूक बंद होती. यात रेल्वे, बस, विमान व जल वाहतुकीचाही समावेश असून सर्वांनाच जबर फटका बसला आहे. आता शासनाने राज्य परिवहन महामंडळाला शिथिलता देत बसफेऱ्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे.मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिकांनी प्रवास टाळला असून परिणामी बस फेऱ्यांना प्रवाशांकडून प्रतिसाद नाही. अशात हा फटका भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यांतर्गत येथील व्यापारी कादर रिजवी यांचा बारदाना नागपूर एमआयडीसी येथून आणून त्यांच्या गोदामात उतरविण्यात आला. शनिवारी (दि.२०) या मालवाहतुकीला नारळ फोडून सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी आगार प्रमुख पंकज दांडगे, व्यापारी रिजवी, माजी आमदार दिलीप बंसोड, नरेश तिडके , चालक पी.बी.सावंत, शिवकुमार कनोजे, छगन लोंदासे, नितीन गजभिये, अनमोल बडोले, दीपक कछवाह उपस्थित होते.
आगाराने सुरू केली मालवाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:00 AM