खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात पावसाने दगा दिला. यंदाच्या कोरोनाच्या वैश्विक महामारीत शेतकरीवर्ग खचला असताना दुबार पेरणीचे संकट ओढवले, तर हलक्या व भारी वाणाच्या धानावर मावा-तुडतुडा रोगाने आक्रमण करीत धान पीक उद्ध्वस्त केले असतानासुद्धा शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात धान उत्पादन घेतले. आधीच कोरोनाच्या सावटात शेतकरी हतबल झाला असताना सावकार, बँका, इतरांकडून उसनवार व कर्ज घेतले. यंदाच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमी झाले असले तरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला योग्य भाव देण्यात येणार असला तरी, विक्री केलेल्या धानाची रक्कम खात्यात जमा होईल. बँकांकडून व सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची मार्च महिन्याच्या मुदतीत परतफेड होईल, या आशेने शासकीय धान खरेदी केंद्रावर संबधित शेतकऱ्यांनी धान विक्री केली.
दरवर्षी धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी-विक्री सुरू असतानाच धान भरडाईकरिता धानाची उचल करण्यात येत होती. परंतु यंदाच्या खरीप हंगामात शासन व राईस मिलर्स यांच्यात धान भरडाईच्या रकमेवरून वाद उफाळल्याने अद्यापही तीन महिन्यापासून केंद्रावरील धानाची उचल करण्यात आली नाही. परिणामी तुमसर -मोहाडी तालुक्यातील धान खरेदीचे गोदाम फुल्ल झाले आहेत. गोदामाबाहेर उघड्यावर ठेवलेल्या हजारो क्विंटल धानाला अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यावर बसत आहे. त्यातल्यात्यात शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाचे चुकारे अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या समस्येचे शासनाने वेळीच निराकरण करून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे तात्काळ करावे, अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी केले आहे.