विरली (बु.) : तलाठ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे लाखांदूर तालुक्यातील इटान येथील पूरबाधितांवर शासकिय मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या पूरबाधितांना तातडीने मदत देण्याची मागणी इटान ग्रामपंचायतने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
२९ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने लाखांदूर तालुक्यातील इटान गावाला जोरदार तडाखा दिला. या महापुरात येथील २७ घरे पूर्णतः कोसळली तर अनेक घरांचे अशंत: नुकसान झाले. मात्र, या २७ पूर्णतः बाधित कुटूंबांपैकी केवळ १२ कुटूंबांना शासकीय मदत मिळाली. उर्वरित १५ कुटूंबाची घरे अतिक्रमीत जागेत असल्याचे कारण दाखवून त्यांना मदत नाकारण्यात आली. इटान येथील तलाठ्यांनी सदर घरे अतिक्रमीत जागेत असल्याची माहिती दिली, असा आरोप येथील ग्रामपंचायतने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
वास्तविक ग्रामपंचायत नमुना आठवर सदर घरे कुठल्याही अतिक्रमीत अथवा शासकीय जागेत असल्याची नोंद नाही. त्याचप्रमाणे पूर्णतः बाधित व अंशतः बाधित कुटूंबांचा समावेश घरात पाणी घुसणे या यादीत केलेला नसल्यामुळे सदर कुटूंब १० हजार रुपये व अन्नधान्याच्या मदतीपासूनही वंचित झाले आहेत. ही सुधारित यादीदेखील तलाठ्यांनी पाठविली असल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.
खासदार सुनील मेंढे यांना या पूरबाधितांची तक्रार प्राप्त होताच त्यांनी तातडीने तक्रारीची दखल घेतली. याविषयी योग्य ती कार्यवाही करून पूरबाधितांना तातडीने मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.