अजय पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या व मोर्शीसह अमरावती शहराची तहान भागवणाऱ्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी कडक उन्हाळ्याच्या दिवसात अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पातळीत कमालीची घट होत असून यावर्षी सुद्धा पाण्याचा जलसाठा अर्ध्यावरच येऊन ठेपला आहे. सध्या सिंभोरा जलाशयात केवळ ५०.५१ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व एमआयडीसी येथेसुद्धा पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा जमा होत असल्यामुळे अमरावतीकरांना बाराही महिने पाणीटंचाई भासत नाही. या धरणातून शेतीसह औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पाणी पुरवठा केला जातो.
- जानेवारी महिन्यात सिंभोरा धरणातील पाण्याची पातळी ३४१.२७ दशलक्ष घनमीटर होती व उपयुक्त जलसाठा ४५७.४९ दलघमी म्हणजे ८१ टक्के जलसाठा होता. परंतु जानेवारी ते एप्रिलपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत हा जलसाठा जवळपास ३० टक्क्यांनी घटला.
- सध्या धरणातील जलसाठा ३३८.८६ मीटर असून उपयुक्त साठा २८९.३२ दलघमी आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अप्पर वर्धा धरणात केवळ ५०.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
- गेल्या चार महिन्यांत या धरणातून नॉन एरीकेशनकरिता २८.१४३ दलघमी पाणी सोडण्यात आले. गेल्या तीन महिन्यात शहरवासीयांना १३.६७२ दलघमी पाण्याचा पुरवठा करण्यात आला.
- सिंचनाकरिता ११३.५४ एमआयडीसीला ०.६११ आणि रतन इंडिया कंपनीला ६.३४८ दलघमी पाणी पुरविण्यात आले आहे.