भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करायचा असल्यास सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे झाले आहे. गतवर्षी लाॅकडाऊन असतानाही मास्क, सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे नागरिकांमध्ये असणारी कोरोनाची असलेली भीती यामुळे सॅनिटायझर वापराचे प्रमाण जास्त होते. मात्र आता त्या तुलनेत आता सॅनिटायझर वापरामध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनातर्फे जनजागृती करून वापराचे आवाहन केले जात असले तरी सॅनिटायझरच्या किमतीही किंचित महागल्या असल्याने नागरिकांचा कल कमी झाला आहे. मात्र मास्क अनेकजण वापरत असल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायगर हे निर्जंतुकीकरण असून त्याचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात काही प्रमाणात अल्कोहोल असल्याने त्यापासून कोरोना विषाणू रोखण्यासाठी मदत होते. दिवसभर काम करत असताना, कोणत्याही वस्तूंना गाडीला अथवा विविध ठिकाणी हात लावल्यानंतर स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या घटत गेली आणि नागरिकांमध्ये असणारी भीती कमी झाली. मात्र आता संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र नागरिकांनी सॅनिटायझर वापरण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने औषधांचे दर नियंत्रणात ठेवण्याचीही नागरिकांतून मागणी होत आहे. सन २०२० च्या मार्च, एप्रिल कालखंडात जिल्ह्यातील विविध मेडिकल दुकानांमधून मास्क, सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती मात्र यावर्षी हे चित्र बदलले असल्याचे दिसून येत आहे. बॉक्स
१मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केवळ शासकीय नोकरदार व श्रीमंत वर्गामध्ये नियमित केला जात असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मात्र आजही अनेकजण मास्क वापरत नसल्याचेच दिसून येत आहे.
२ विविध शासकीय कार्यालयात, बँका, बसस्थानक अशा ठिकाणी शासनाने मोफत सॅनिटायझर वाटल्यास त्याचा सर्वसामान्य नागरिकांना चांगला फायदा होऊ शकतो.
३ गतवर्षी आणि सामाजिक संस्था तसेच सामाजिक बांधिलकीतून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक संस्थांनी सॅनिटायझर मास्क वाटपासाठी पुढाकार घेतला होता आता पुन्हा एकदा जनजागृती करून जिल्हा प्रशासनाने विविध संस्था समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करून पुन्हा एकदा वाटपाचे काम करण्याची गरज आहे.
कोट
सॅनिटायझर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यासाठी सर्वांनी व मास्क, सॅनिटायझर आवर्जून वापरलेच पाहिजे. कोरोना संसर्गाची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
गीता बोरकर,मुख्याध्यापिका, पिंपळगाव.
कोट
सॅनिटायझर उपलब्ध न झाल्यास नियमितपणे साबणाने स्वच्छ वारंवार हात धुवावे. यासोबतच घराबाहेर जाताना मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टंन्सिंग राखून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घेतला पाहिजे.
रजनी वैद्य,
मुलींचे वसतिगृह, अधीक्षक.
कोट
सॅनिटायझरचा वापर गेल्या वर्षी होता तसाच यावर्षी होतच आहे. मात्र आता नागरिकांमधील थोडी भीती कमी झाली आहे. सॅनिटायझरच्या किमतीत वाढ झालेली नाही. याउलट मास्कचे दरही कमी झाले आहेत. अनेक ग्राहकांचा कल सॅनिटायझरच्या लहान बॉटल खरेदीकडे आहे.
संजय निंबार्ते, कोषाध्यक्ष, भंडारा जिल्हा औषध विक्रेता संघ, भंडारा.