लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चिखला, येदरबुची व सीतासावंगी ही तीन गावे मिळून चिखला भूमिगत खाणीचे क्षेत्र आहे. सन १९६२ मध्ये ही संपूर्ण खाण भारत सरकारच्या अंतर्गत आली. १९५० मध्ये या खाणीला भूमिगत खान म्हणून रीतसर परवानगी देण्यात आली होती. त्यापूर्वी या खाणीवर ब्रिटिशांची मालकी होती. शासकीय दस्तावेजात खान मंत्रालयाने २४ ऑक्टोबर २००० मध्ये १५०.६५ हेक्टर क्षेत्राची नोंद केली आहे. त्यात महसूल विभागाची ७०.०७ हेक्टर व महसूल विभागाची ८९.५८ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. सातपुडा पर्वतरांगांत असून, येथे नैसर्गिक टेकड्या काही प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या नियमाला डावलून येथे टेकड्या व जंगल उद्ध्वस्त होत असल्याची माहिती आहे.
चिखला, येदरबुची व सीतासावंगी हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वतरांगेत आहे. येथे घनदाट जंगल असून, राखीव वनाची त्यात तरतूद आहे. खाणीच्या सभोवताल नैसर्गिक टेकड्या आहेत. या टेकड्याही आता खाण प्रशासनाच्या अखत्यारित असून, या नैसर्गिक टेकड्यावर ब्लास्टिंग करून तेथील मॅगनिज काढणे सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक टेकड्यांचे अस्तित्व येथे धोक्यात आले आहे. येथे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने त्यास परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. चिखला ही खान भूमिगत आहे, परंतु येथे खुल्या टेकड्यावरही ब्लास्टिंग करून मॅगनिज काढले जात आहे.
टेकड्यांचे भूस्खलन होण्याचा धोकाचिखला भूमिगत खाणीत, तसेच खुल्या टेकड्यावरही रोज ब्लास्टिंग केले जात असल्याने टेकड्यांचे दगड सैल होऊन भूस्खलन होण्याच्या धोका येथे वाढला आहे. टेकड्यांच्या परिसरातच खाण कामगारांच्या सदनिका व ग्रामस्थांची घरे आहेत.
२०४२ पर्यंत लीजची मुदतकेंद्र सरकारच्या खाण व इस्पात मंत्रालयाने चिखला येथील भूमिगत खाणीला ३० जून २०४२ पर्यंत मुदत दिली आहे. काही वर्षात या खाणीला भूमिगत आणि खुल्या खाणीची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. चिखला येथील भूमिगत खाणीत सध्या पाच लेअर वर काम सुरू आहे. एक लेयर २० मीटरची आहे. म्हणजे चिखला येथील भूमिगत खाण दीडशे मीटर खोल आहे.
चिखला व सीता सावंगी गावाला धक्केचिखला व सीता सावंगी येथील भूमिगत मॅगनिज खाणीत रोज ब्लास्टिंग केलेजाते. त्यामुळे या परिसरातील घरांना सौम्य भूकंपाच्या धक्क्याच्या भास दररोज होतो. काही घरांना येथे तडे गेले आहे. चिखला खाण प्रशासनाने कामगाराकरिता सीता सावंगी येथे सदनिकांचे बांधकाम केले आहे. परंतु, ग्रामस्थ मात्र जीव धोक्यात घालूनच येथे वास्तव्य करीत आहेत.