रंजीत चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात जंगलव्याप्त गावाचे शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांचे उपद्रवाने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. हरभरा पिकांची नासाडी झाली आहे. धान उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. वन विभागाची देण्यात येणारी आर्थिक मदत आखडती असल्याने सरसकट मदत घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सिहोरा परिसरात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी उत्पादन घेत आहेत. परंतु वन्य प्राण्यांचे उपद्रवाने पिकांचे प्रचंड नुकसान सोसण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. हरभरा पिकांचे नुकसान वन्य प्राणी करीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दिवस रात्र शेतशिवारात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार राहत असल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आली आहे. पिकांचे नुकसान वन्यप्राणी रानडुक्कर करीत आहेत. पिकांचे मुळे पोखरून काढत असल्याने अतोनात नुकसान सोसावे लागत आहे. शेत शिवारातून वन्यप्राण्यांना हाकलून लावण्यासाठी शेतकरी अनेक उपाययोजना करीत असले तरी यात ते यशस्वी होताना दिसत नाहीत. पिकांचे नुकसान सोसल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वन विभागाला वारंवार सूचना देत आहेत. निवेदनाचा पाऊस करीत आहेत. परंतु युद्धस्तरावर वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नाहीत. शेत शिवाराला सुरक्षित करण्यासाठी महत्वाकांक्षी योजना नाही. वन्य प्राण्यांचे कायमस्वरूपी बंदोबस्त करता येत नाहीत. यामुळे वन्यप्राणी आणि शेतकरी असा संघर्ष होताना दिसत आहे. वन्य प्राण्यांची हत्या करण्यासाठी खाद्य पदार्थात स्फोटकांचे मिश्रण करण्यात येत आहेत.
जंगल शेजारी असणाऱ्या गावाचे शेतशिवारात मृतावस्थेत अनेक रानडुक्कर आढळून आलेल्या आहेत. वन विभागाच्या यंत्रणेने हा अनुभव घेतला आहे. पंचनामा केल्यानंतर मृत रानडुक्करांना जमिनीत पुरण्यात आले आहेत. अन्य वन्य प्राण्यांचे बाबतीत असेच चित्र आहे. या वन्य प्राण्यांची माहिती मात्र वन विभागाला देण्यात येत नाही. दरम्यान पिकांचे नुकसान झाल्यानंतर वन विभागाची यंत्रणा सर्वेक्षण करीत आहेत. परंतु आर्थिक मदत आखडती असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. सर्वेक्षणाच्या आधारावर देण्यात येणारी आर्थिक मदत तोडकी आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्य प्राण्यांचे करवी नासाडी असे संकट शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत घोषित करण्यात येत नाही. एकरी देण्यात येणारी मदत नुकसान भरपाईचा आकडा ओलांडत नाही. नुकसान हजारो रुपयांचे घरात असताना शेकडोची मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.
जंगलव्याप्त गावाशेजारील शेतकरी हतबल
जंगलव्याप्त गावांचे शेजारील शेतकरी, परिसरातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने हतबल झाले आहेत. धान उत्पादन शेतकऱ्यांचे पुजण्याची नासाडी रानडुक्कर करीत असल्याचे अनेक प्रकरणे वन विभागाच्या दालनात दरवर्षी सादर करण्यात येत आहेत. परंतु आर्थिक मदत दिली जात नाही. या शिवाय शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती राहत असल्याने भगवान भरोसे पिकांना सोडले जात आहेत. शासन स्तरावरुन शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी नुकसान भरपाई देताना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे विनोद पटले, ग्रामपंचायत सदस्य शीतल चिंचखेडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनवणे, योगराज टेंभरे, सरपंच सुषमा पारधी, सरपंच उर्मिला लांजे, सरपंच वैशाली पटले यांनी केली आहे.