चरण वाघमारे : दुग्ध उत्पादकांना दिलासा, बेरोजगारांना मिळणार रोजगार भंडारा : भंडारा जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, दुधाला योग्य भाव मिळावा व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती व्हावी हा हेतू समोर ठेवून भंडारा जिल्ह्यात दुग्धजन्य प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली असून यामुळे दुग्ध उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, पवनी, लाखनी, साकोली व लाखांदूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत. भंडारा जिल्ह्यात दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे कारखाने स्थापन झाले नसल्याने भंडारा जिल्ह्यातील दूध इतर जिल्ह्यात नेऊन त्यावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यात येतात. त्यामुळे गोपालक तथा दुग्ध उत्पादकांना दुधाचे योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असतो. ज्या विद्यार्थ्यांनी डेअरी फार्ममध्ये पदविका किंवा पदवी संपादीत केली आहे, अशा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळत नसल्याचे निदर्शनास येताच याबाबत आमदार चरण वाघमारे यांनी हा मुद्दा सभागृहात चर्चेदरम्यान ध्यानाकर्षण केले. याप्रकरणी सभागृहाने निर्णय घेण्याचा आग्रह वाघमारे यांनी केला असता मुख्यमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्यात दुग्ध जन्य पदार्थ तयार करण्याचा प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे गोपालक व दुग्ध उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. तसेच भंडारा जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी डेअरी सायन्स या विषयात पदविका किंवा पदवी संपादित केली अशा सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल. युती सरकारचा लोककल्याणकारी, धोरणात्मक निर्णय असून यामुळे भंडारा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी बांधवांना निश्चितपणे दिलासा मिळाणार असल्याची प्रतिक्रिया वाघमारे यांनी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)
दुग्ध प्रकल्पातून साधणार विकास
By admin | Published: December 23, 2015 12:39 AM