विकास साधण्यासाठी समन्वयाची नितांत गरज असते. स्थानिक प्रशासन व नागरिक यांच्यात विकासाबाबत समन्वय असेल तर प्रत्येक समस्येवर मार्ग काढता येतो. समन्वय नसल्यास गावाचा विकास खोळंबतो. लाखनी तालुक्यातील खराशी गावची लोकसंख्या १३६८ आहे. या गावाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भरभरून निधी दिला. गावाला अपेक्षित असलेले शिक्षणाचे द्वार प्रेरणादायी ठरले. अख्ख्या राज्याच्या कानाकोपऱ्यात खराशी गावाला शिक्षणाधिकारी, आयुक्त, शैक्षणिक चळवळीचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्र्यांनी हजेरी लावली. प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व गावकऱ्यांतून विद्यार्थ्यांना कसे पुरविता येते याचे उदाहरण खराशीची जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा ठरली.
कोरोना संकटात शासनाने पुरविलेल्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या सहकार्याने गावात ९० टक्के लसीकरण करण्यात आले. याची दखल प्रशासनाने घेत पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा सन्मान केला. संपूर्ण लाखनी तालुक्यासह जिल्ह्याला लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. पिण्याच्या पाण्यासाठी गाव स्वयंभू बनले. प्रत्येक घरात नळ असून, पाणी वाचवा पाणी जिरवा मोहिमेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. भर उन्हाळ्यात सुद्धा पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही. गावकऱ्यांच्या समन्वयाने गावाचा चेहरामोहरा बदलला. गृहकर वसुली ९० टक्केच्या वर असून, पंचायत राजमध्ये ग्रामपंचायतीचे विशेष महत्त्व निर्माण झाले आहे. गावातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते गावाची शान झाली आहे.
बाॅक्स
लोकसहभाग विकासाचा पाया
लोकसहभाग हा विकासाचा पाया आहे. खराशी ग्रामपंचायतीतही लोकसहभागातून विविध योजना राबविण्यात आल्या. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विविध विकासकामे निर्माण केली. सात सदस्य आणि एक सरपंच अशा या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. गाव करी ते राव काय करी याचा प्रत्यय आता खराशीत येत आहे.
कोट
खराशी हे गाव सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात पूर्वीपासून अग्रेसर आहे. गावातील विकासकामांत समन्वय असल्याने विकास वेगाने होत आहे. पक्षीय भेद केवळ निवडणुकीपुरताच असतो. त्यानंतर मतभेद विसरून सर्वजण एकजूट होतात.
-अंकिता झलके, सरपंच खराशी.