भंडारा शहरासह जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना संसर्गामुळे दरवर्षीसारखी आरास आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी नसली तरी भक्तांनी आपल्या घरी गणरायाची स्थापना केली होती. या दहा दिवसात कोरोना नियमांचे पालन करीत विविध धार्मिक उत्सवही पार पडले. जिल्ह्यात कुठेही गणेशोत्सवाला गालबोट लागले नाही. आता बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. रविवारी गणेश विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह स्थानिक नगरपरिषदांनाही जय्यत तयारी केली आहे.
भंडारा नगरपरिषदेच्यावतीने ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम टँक तयार करण्यात आले आहे. यासोबतच मिस्किन टँक तलाव, खांबतलाव, सागरतलाव, पिंगलाई मंदिर त्याचप्रमाणे वैनगंगा नदीघाटावरही विसर्जनाची व्यवस्था केली आहे. तसेच शहरात दोन ठिकाणी कृत्रिम तलावही निर्माण करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी वैनगंगा नदी परिसरात लाकडी कठडे लावण्यात आले आहे. तसेच तेथे निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहे. यासोबतच नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सफाई विभागातील अधिनस्त कर्मचाऱ्यांनाही तैनात केले आहे. यासोबतच जिल्ह्यातही ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. विनामास्क आढळल्यास नगरपरिषदेच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.
बॉक्स
वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ
संजय सरोवराचे पाणी सोडल्याने भंडारा शहरातील कारधा पुलाजवळ वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याठिकाणी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन करताना कोणीही खोल पाण्यात जाऊ नये, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांची पालन करावे, प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.
बॉक्स
खोल पाण्यात जाणे टाळा
रविवारी बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. धरण, जलाशय, तलाव, नदी, नाले आदींची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी, मूर्ती खोल पाण्यात विसर्जन करण्याचा आग्रह करू नये.
बॉक्स
शक्य तो घरीच करा विसर्जन
कोरोना संसर्ग आणि जलाशयाच्या पाणी पातळीत झालेली वाढ यामुळे घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ते शक्य नसेल तर कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करावे.
कोट
जिल्ह्यात दहा दिवस गणेशोत्सव अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडला. विसर्जनाच्या दिवशीही नागरिकांनी नियमांचे पालन करावे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे. नियमांचे पालन करावे.
-संदीप कदम, जिल्हाधिकारी