भंडारा : लहान मुलांचा शैक्षणिक विकास हाेण्याबराेबर शारीरिक विकास हाेणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. मैदानात खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामध्ये जंतदाेष हा लहान वयात सहज हाेणारा व गंभीर आजार आहे. जंतदाेष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करताे. हा आजार हाेऊ नये म्हणून जंतनाशक गाेळ्यांचे वाटप केले जाते. मात्र शाळा सुरु नसल्याने हे वाटप थांबले आहे.
मात्र, २१ सप्टेंबरपासून ही माेहीम सुरू हाेणार असल्याचे समजते. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतदाेषाचा संसर्ग हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. जंतदाेष हे कुपाेषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे जंतदाेष आढळणारी मुले हे नेहमीच अशक्त व थकलेली असतात. यामुळे बालकांची शारीरिक व बाैद्धिक वाढ खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. यंदा काेराेनामुळे शाळा बंद असल्याने या माेहिमेला अडथळा आला आहे.