इंद्रपाल कटकवार
भंडारा : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणालाही मुकावे लागले. त्यात भरीस भर रस्त्यावर अपघातांतही अनेकांचा मृत्यू ओढवला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास मरण स्वस्त झाले काय, असे वाटू लागले आहे.
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे जीवही कोरोना महामारीने गेले.
संचारबंदी, लॉकडाऊन असले तरी रस्त्यावरील रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी रस्ते अपघातांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मागील सहा महिन्यांत १५८ रस्ते अपघात झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २७ ने अधिक आहे. ७२ व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला. गतवर्षी म्हणजे जानेवारी ते मे २०२० या कालावधीत ५५ व्यक्तींनी आपला जीव गमावला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ७२ व्यक्तींपैकी अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे ११ व्यक्ती, डेंजर ड्रायव्हिंग २९, दारू प्राशन केल्यामुळे एक, चुकीच्या साईडमध्ये वाहन चालविल्यामुळे पाच जण तर अन्य कारणांमुळे २६ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. महामार्गावर रस्त्यांची उंची कमी-जास्त असणे, जोड रस्त्यांची उंची कमी असणे तसेच ॲप्रोच रोड व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हे सर्व अपघात घडले आहेत. याशिवाय वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त ठेवणे, हेल्मेटचा वापर न करणे, नियमांचा भंग करणे यामुळेही अपघातांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने काही काळ संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या मोठी आहे. गत दीड वर्षात रस्ते अपघातांत १२७ जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावर होणारे अपघात हा गंभीर विषय असून अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्याचे समजते.
बॉक्स
पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका
अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे.
बॉक्स
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
रस्ते अपघातात अनेकदा नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येते. यात सर्वाधिक नियमापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करणे, चुकीच्या साईडने वाहन चालविणे या बाबींचा समावेश असतो. ही सर्वांत मोठी घोडचूक तरुणाई करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामतः मृतांमध्ये तरुणांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येते.
बॉक्स
या ठिकाणी वाहने हळू चालवा
रस्ते अपघात घडू नयेत यासाठी वाहतूक विभागासह प्रशासन नेहमी नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करीत असते. वळणदार रस्ते, ब्लॅक स्पॉट या ठिकाणांहून वाहने हळू चालवावीत, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्याची परिणती अपघातामध्ये होऊन व्यक्ती मृत्यूस कारणीभूत ठरतो.
कोट बॉक्स
अपघातानंतर माझी दिनचर्या बदलून गेली आहे. जीवन अमूल्य आहे, याची कल्पना मला आली आहे. आपल्यासोबत इतरांचेही आयुष्य आपण धोक्यात घालत असतो. त्यामुळे वाहन चालवताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
मनोज पात्रे, साकोली.
कोट बॉक्स
वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. दोन सेकंदांसाठी माझा जीव वाचला, नाहीतर मी आज या जगात नसतो. नशीब बलवत्तर होते म्हणूनच मी बचावलो. म्हणूनच नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.
- राजेंद्र गाढवे, लाखनी.