अशोक पारधीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: पोट भरण्यासाठी मनुष्य काहीतरी काम करत असतो. हे काम तो शिक्षण वा प्रशिक्षण घेऊन करताना सामान्यपणे आपण पाहतो. मात्र कुठलेही प्रसिक्षण नसताना व एका अर्थाने कामाचे शिक्षण घेतले नसताना, अनेक कामे कुशलतेने जो करतो त्याला अवलिया वा हरहुन्नरी असे आपण म्हणतो. अशा व्यक्ती कुठलेही काम फार चटकन आत्मसात करतात व त्यात आपल्या प्रतिभेने बरेच नवे प्रयोगही करतात. असा एक हरहुन्नरी अवलिया पाहता येईल भंडारा जिल्ह्यातील पवनी- कारधा मार्गावर असलेल्या एका झाडाच्या सावलीत बसलेला. त्यांचे नाव अमरकंठ खोब्रागडे.अमरकंठ खोब्रागडे यांना सर्वजण अमर या नावानेच ओळखतात. त्यांचे वय सध्या ५५ वर्षांचे आहे. शिक्षण केवळ सहावी पास. मात्र त्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांमुळे त्यांनी अनेक कामात कसब संपादन केले आहे. लहानपणी शाळा सुटल्याने काही काळ शेतीची कामे त्यांनी केली. पुढे कुठेतरी शासकीय विश्रामगृहातील केनच्या खुर्च्यांचे विणकाम पाहिले व ते शिकून घेतले. या वीणकामातून त्यांनी सोफा बनवणे, दिवाण बनवणे हेही आत्मसात केले. या दरम्यान त्यांचे लग्न झाले होते व त्यांना दोन मुलेही झाली होती. आतापर्यंत फिरून काम करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. तो सोडून त्यांनी गावालगतच्या एका झाडाखाली बस्तान मांडले व जे कुणी काम सांगेल ती कामे करणे सुरू केले. केलेल्या कामाचा ठराविक मोबदला त्यांनी आजवर कधीही मागितलेला नाही. अमरावती येथील सावंगपूरच्या अवधूत महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे काम केल्यानंतर समोरची व्यक्ती स्वखुषीने जे देईल त्याचा ते स्वीकार करतात. स्वत:हून कुठल्याही कामाचे पैसे मागत नाहीत. त्यांनी हार्मोनियम दुरुस्ती, झोपड्या बांधणे, कौले शाकारून देणे, टाकावू वस्तूतून शोभेच्या वस्तू बनवणे अशा सगळ््या कामांमध्ये आपली छाप उमटवली आहे. आपल्या दोन्ही मुलांचे योग्यरित्या पालन पोषण करत हा अवलिया आपले आयुष्य व्यतीत करीत आहे.
जरा हटके! हरहुन्नरी अवलिया अमरकंठ खोब्रागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:56 AM
अनेक कामे कुशलतेने जो करतो त्याला अवलिया वा हरहुन्नरी असे आपण म्हणतो. असा एक अवलिया पाहता येईल भंडारा जिल्ह्यातील पवनी- कारधा मार्गावर असलेल्या एका झाडाच्या सावलीत बसलेला. त्यांचे नाव अमरकंठ खोब्रागडे.
ठळक मुद्देकेलेल्या कामाचा मोबदला मागत नाही, जे मिळेल त्याचा स्वीकारअवधूत महाराजांच्या विचारांची प्रेरणा