मोहाडी : येथून जवळच असलेल्या परसवाडा येथे पाटबंधारे विभागाचा १७ हेक्टर जागेत तलाव आहे. हा तलाव मोहाडी मत्स्यपालन सहकारी संस्थेने मासेमारीसाठी लीजवर घेतलेला आहे. या संस्थेचे सभासद मासेमारी करून तलावाची देखभाल करतात. मात्र अशातच परसवाडा येथील पाटबंधारे विभागाच्या तलावात कुशारी येथील पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांनी मोठी खोल नाली खोदल्याची तक्रार मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष सचिवांनी विभागीय कार्यालय सिंचन भवन, कार्यकारी अभियंता भंडारा यांच्याकडे केली असून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. नुकतेच नहर खोलीकरणाचे काम झाले. त्या कामावरील पोकलेन मशीनने पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांनी मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सभासदांना कोणतीही विचारपूस न करता तलावाच्या मध्यभागातून गेटपर्यंत मोठी खोल नाली खोदली आहे.
या नालीमुळे तलावातील संपूर्ण पाणी कॅनॉलद्वारे वाहून जाणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तलावातील लाखो रुपयांचे मासे मृत्यू पावतील. मत्स्यपालन संस्थेचे मोठे नुकसान होईल. कुशारी पाणी वापर संस्थेचा अध्यक्ष हा नेहमीच शेतकऱ्यांकडून पैसा घेऊन त्यांना तलावातील पाणी विकतो. त्यासाठीच त्याने ही नाली खोदल्याचा आरोप मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिव सखाराम मारबादे यांनी तक्रारीत केला आहे.
बॉक्स
तलावावर केले अतिक्रमण
जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या या तलावाच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. १७ हेक्टर जागेत असलेला हा तलाव अतिक्रमणांमुळे फक्त ६, ७ एकरामध्येच उरलेला आहे. तलावाच्या तिन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनी तलावात अतिक्रमण करून शेती तयार केली आहे. काहींनी तर चक्क त्या शेतीत दुमजली घरे बांधली आहेत. अतिक्रमण व तलावातील गाळामुळे तलावात पाणी साठविण्याची क्षमता दिवसेदिवस कमी कमी होत आहे. हे दुष्टचक्र असेच सुरू राहिल्यास हा तलाव नामशेष होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाने या तलावाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. परिणामी तलाव गाळाने भरला आहे. पाळींना भेगा पडल्या असून गेट नादुरुस्त राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकंदरीत, दुर्लक्ष झाल्याने तलावांच्या सिंचन क्षमतेवर परिणाम झाला असून याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.