लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आयएएस पूजा खेडकर यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रावर राज्यात संशयकल्लोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातही १६ शासकीय कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांवर आक्षेप घेण्यात आला आहे. तूर्तास या आक्षेपांवर अंतिम निर्णय घेण्यात आला नसला तरी सर्व प्रकरणे चौकशीत आहेत. यावर नागपूर मेडिकल बोर्डाच्या निर्णयानंतर कारवाई अपेक्षित आहे.
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गत आठवड्याभरापासून चर्चेत आहे. चारचाकी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिल्यामुळे पुणे वाहतूक विभागाने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर एक-एक प्रकरणे समोर येत आहेत.
यात त्यांनी अपंगत्व आणि ओबीसी कोट्याचा गैरवापर केल्याच्या दाव्यासह अन्य परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. खेडकर यांनी दृष्टिहीन असल्याचाही दावा केला आहे. त्यातही संशय वाढल्याने शेवटी राज्य सरकारने चौकशी समिती गठित केली आहे. या प्रकरणानंतर राज्यभरातच बोगस अपंगत्व प्रमाणपत्रावर शासकीय नोकरी बळकावणाऱ्यांवर आपसूकच संशयाची सुई गेली आहे. या संबंधाने जिल्हा पातळीवरही चर्चेला पेव फुटले आहे.
भंडारा जिल्ह्यात दिव्यांगांची संख्या भरपूर असली तरी त्यातील शासकीय आले अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. नगरपरिषद, नगरपंचायत, तालुका प्रशासन, जिल्हा परिषद, यासह राज्य शासनाच्या अन्य विभागात दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या आहे. यात भंडारा जिल्ह्यातील १६ शासकीय कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांवर आक्षेप नोंदविण्यात आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून ही प्रकरणे नागपूर मेडिकल बोडांपर्यंत पोहोचती करण्यात आली असून त्यावर तपासणी व निर्णय प्रक्रिया सुरू आहे.
सर्वाधिक आक्षेप महसूल, शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांवर आक्षेप नोंदविणाऱ्यांमध्ये महसूल, स्थानिक प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी असल्याची बाब उघडकीला आली आहे. यात आरोग्य विभागातील ही कर्मचारी असल्याचे समजते. तसेच आंतरजिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आले आहे. या १६ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बाबत प्रमाणपत्रांविषयी निर्णय घेण्यात आलेला नाही, हे येथे उल्लेखनीय.
निर्णयाचा चेंडू नागपूर मेडिकल बोर्डाकडेभंडारा जिल्ह्यात यापूर्वी दिव्यांगांच्या खोट्या प्रमाणपत्रांबाबत बाबी समोर आल्या आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून ही प्रकरणे नागपूर मेडिकल बोर्डाला पाठविण्यात आली आहे. बोर्डासमोर शहानिशा झाल्यावरच अपंगत्व प्रमाणपत्रांच्या आक्षेपाबाबत कारवाई केली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागात शिक्षक प्रवर्गात अनेक बोगस दिव्यांग आहेत, हे विशेष. मात्र त्यावर खुलेआम बोलायला किंवा तक्रार करायला कोणीही समोर येत नाही.
भंडारा दिव्यांगनिहाय लोकसंख्यादिव्यांगत्वाचे प्रकार एकूण दिव्यांग व्यक्तीअंध 9566कर्णबधिर 6462मुकबधीर 8684अस्थिव्यंग 7164मतिमंद 2695मानसिक आजार 718बहुविकलांग 2100इतर कोणतेही 7310एकूण 44699
बोगस प्रमाणपत्र बाळगणाऱ्यांवर कारवाई हवीनैसर्गिकरीत्या जे बांधव किंवा भगिनी खऱ्या अर्थाने अपंगत्व व दिव्यांग आहेत, अशांना शासकीय योजनेसह अन्य लाभ मिळाला पाहिजे. खोटे प्रमाणपत्र बनवून किंवा सादर करून शासकीय नोकरी मिळवित लाभ उचलत असतील तर अशा लोकांची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई होणेअपेक्षित आहे. जेणेकरून खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही.- काशिनाथ ढोमणे, मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी-कर्मचारी संघटना.