अपंग बांधवाची व्यथा : नायब तहसीलदार व लिपिकाच्या चुकीचा फटकाएकोडी : येथील ६० टक्के कायम अपंग असलेला चुडामण जगु ठाकरे या अपंगाला साकोली तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागातील नायब तहसिलदार व लिपीकाच्या चुकीमुळे गेल्या आठ महिन्यापासून मानधनासाठी वंचित राहिला आहे.राज्य शासनाने व केंद्र सरकारने समाजातील अंध, अपंग, मुक बधिर, मतिमंद, विशिष्ट आजाराने ग्रासलेला दुर्बल गरजू लोकांना जिवन जगण्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तिला ६०० रुपये शासन प्रतिमहिना मानधन देतो. या मानधनात लाभार्थी आपली उदरनिर्वाह करित असतो. एकोडी येथील चुडामण जगू ठाकरे या ६० टक्के कायम अपंग असलेला व्यक्तिला शासनाने सन २०११ पासून अनुदान सुरु केले. परंतु मार्च २०१४ या महिण्यापासून संबंधित लाभार्थीचे मानधन बंद करण्यात आले. सोबतिच्या लोकांना मानधन सुरु असून कायदे का बंद करण्यत आले. यासाठी चुडामण साकोली तहसिल कार्यालयात अनेकदा चौकशी करण्यास गेला असता त्याला लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक इत्यादीचे कामे असल्याने निवडणूक झाल्यावर येण्यास सांगितले गेले. नोव्हेंबर महिण्यात अपंग चुडामण ठाकरे तहसिल कार्यालयात गेला असता त्याला जिल्हाशल्य चिकित्सक भंडारा यांचे अपंग प्रमाणपत्र सांगितले ते त्यांनी सादर केले. अपंग प्रमाणपत्रात सदर लाभार्थी हा ६० टक्के कायम अपंग असून कायम अपंग असलेल्या व्यक्तिला मानधन हे आजीवन सुरु राहते. ही चुक तेथील लिपीक व नायब तहसिलदार यांच्या लक्षात आणून दयावी लागली. तेव्हा कुठे त्यांनी नोव्हेंबर २०१४ पासून संबंधितांचे मानधन सुरु केले.नायब तहसीलदार व संबंधित लिपीक यांच्या चुकीने अपंग चुडामन ठाकरे यांचा मानधन बंद झाला. याला जबाबदार साकोली तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारी असतांना अपंग चुडामण ठाकरे थकीत आठ महिण्याचे मानधन मिळण्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. थकीत मानधन न देण्याबाबत कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय नसताना तोंडी आदेशाने अपंग व्यक्तिचे मानधन बंद करतात, हा एक चर्चेचा विषय आहे. संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार पवार यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले एखादया लाभार्थी व्यक्तिला जास्त पैसे गेले तर तो परत करत नाही. त्यामुळे चुडामण याला थकित मानधन देता येणार नाही. मानधन बंद का केले यावर बोलताना ते म्हणाले यापूर्वी कार्यरत संबंधित लिपीकाने लेजरवर फेब्रुवाररी १४ पर्यंत मानधन दिले जाईल असी नोंद केल्याने मार्चपासून मानधन बंद करण्यात आले. (वार्ताहर)
आठ महिन्यांपासून अनुदानापासून वंचित
By admin | Published: December 20, 2014 10:34 PM