तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि शुक्रवार १४ मे रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग बंद केला. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावे तहानलेलीच आहेत. या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणी विसर्ग करण्याचे नियोजन चुकल्याचे दिसून असून, किमान १० एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्याची गरज होती.
तुमसर तालुक्यातील सुमारे १५ गावे व मध्य प्रदेशातील बारा गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आंतरराज्य बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याची मागणी होती. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी बालाघाट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पाणी विसर्ग करण्याची मागणी केली होती. त्या आनुषंगाने बालाघाट येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरणातून पाणी विसर्ग करण्याच्या निर्देश दिले होते. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बावनथडी धरणातून ४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. लगेच १४ मे रोजी दुपारी ४ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. मध्य प्रदेशातील मोवाडपर्यंत आणि तुमसर तालुक्यातील बपेरा व महालगावपर्यंत पाणी पोहोचले नसल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील टेकाडी, चिचोली, शंकरपिपरिया, डोंगरिया या गावापर्यंत अद्याप पाणी पोहोचले नसून बावनथडी नदीचे पात्र अद्याप कोरडे आहे.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीकाठावर असून, नदी घाटातील गावात तीन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड व उसाची शेती केली आहे. या शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी ही पिके मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली आहेत नळ योजना सुद्धा शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी धरणातून केवळ ५ एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले नाही. किमान दहा एमसीएम पाण्याच्या विसर्ग करण्याची गरज होती. अल्प पाण्याच्या विसर्गामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही. किमान १० एम.सीएम पाणी विसर्ग करण्याची मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.
बॉक्स
पाण्यावर दोन राज्यांच्या हक्क
बावनथडी धरण आंतरराज्यीय असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे हा संयुक्त प्रकल्प आहे. धरणातील पाण्यावर मध्य प्रदेशात शासनाचे नियंत्रण आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी मध्य प्रदेशची आहे. दरवर्षी एप्रिलच्या मध्यात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्यात येतो. यावर्षी मे महिन्यात पाणी विसर्ग करण्यात आले. धरणातून पाच एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्र कोरडे असल्यामुळे अनेक गावापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही.
बॉक्स
रेती घाटावर मेहरबानी
मध्य प्रदेश शासनाने बावनथडी नदीकाठावरील सर्व रेती घाटांचे लिलाव केला आहे. पाणी विसर्ग केल्यामुळे रेती उत्खननाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यांचे हित लक्षात घेऊन कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याची माहिती आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पाण्याविना येथे हाल सुरू आहे.
कोट
बावनथडी धरणातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मध्य प्रदेशातील दहा ते बारा गावांत अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे येथील भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. येथे तत्काळ पुन्हा पाणी विसर्ग करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
मुकेश ठाकरे, सरपंच