पालांदूर : चुलबंद खोऱ्यासह अख्ख्या लाखनी तालुक्यात बागायत शेतीचे क्षेत्रफळ दररोज वाढत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन समस्या उभी राहिल्याने उन्हाळी हंगामात बागायतदारांना नुकसान सहन करावे लागले. ही मरगळ झटकून पुन्हा पावसाळी बागायतीचे पूर्वनियोजन सुरू झालेले आहे.
पालांदूर येथील शेतकरी रूपेश भुसारी यांच्यासह अनेक शेतकरी पावसाळी बागायतीत व्यस्त आहेत.
दिवसेंदिवस शेतकरीसुद्धा शेतीत बदल घडवत आहे. तांत्रिक जमान्याचा आधार घेत हौशी शेतकरी शेतीत नवे तंत्र उपयोगात आणत शेती कसत आहे. चुलबंद खोरे सुजलाम् सुफलाम् आहे. कृषी विभागाचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषी तंत्रज्ञान, कृषी मित्र शेतकऱ्यांच्या सोबत आहेत. मल्चिंग पेपरचा आधार घेत जमिनीला नैसर्गिक उतार देत बागायतीचे क्षेत्र नवे रूप स्वीकारत आहे. स्पर्धेच्या युगात भाजीपाल्याचा दर्जा सुधारण्याकरिता नवे तंत्र उपयोगात येत आहे. वर्षाच्या ३६५ दिवसही हिरवा भाजीपाला चुलबंद खोऱ्यात उत्पादित होत आहे. स्वतः शेतकरी चारचाकी वाहन घेत मोठ्या भाजी मंडीत स्वतः भाजी विकत आहे. सब्जी मंडीत गेलेल्या मालाला कशी किंमत मिळते याचा प्रत्यक्ष अनुभव बागायतदार घेत आहे.
वर्तमानात चुलबंद खोऱ्यात उन्हाळी भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणात आहे. टोमॅटोसारखे पीक अधिक उष्णतेत पिकवले जात आहे. कारले, भेंडी, वांगी, पालेभाज्या, कोहळा, टरबूज, फणस यासारख्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळत आहेत. यामुळे बागातदाराच्या हातात पैसा खेळत आहे.
चौकट
स्पर्धा वाढल्याने उत्पादित मालाचा दर्जा वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. बीटीबी सारख्या मोठ्या भाजी मंडीत दर्जेदार भाजीपाला अत्यावश्यक आहे. मल्चिंग पेपरचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून निंदनाचा त्रास कमी होतो. मजूर संख्या कमी लागते. पर्यायाने दोन पैसे बचतीकरिता सोयीचे होते. बरेच शेतकरी धानाची शेती कमी करून बागायतीकडे वळलेले आहेत. सपाट जमिनीला उंचवटा देऊन नैसर्गिक उतार तयार करीत बागायतीचे क्षेत्र दररोज वाढत आहे. पालांदूर, मऱ्हेगाव, वाकल, पाथरी, खराशी, खुनारी, नरव्ह, लोहारा, जेवणाळा, मचारना, इसापूर, गुरडा, गोंडेगाव, कनेरी, आदी गावांत पावसाळ्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत आहे.
संपूर्ण तालुक्यात चुलबंद खोऱ्यासह भाजीपाल्याचे पावसाळ्यातील क्षेत्र प्रगतीवर आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात भाजीपाल्याचे सुमार उत्पादन वाढलेले आहे.
बीटीबी सब्जी मंडी शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरलेली आहे. सेंद्रिय शेतीकडे अधिक लक्ष देत रासायनिक शेती कमी होत आहे. पर्यायाने खर्चातसुद्धा बचत होत आहे.
पद्माकर गीदमारे, तालुका कृषी अधिकारी लाखनी
जिल्ह्यातला पैसा जिल्ह्यातच थांबावा याकरिता प्रयत्न फळाला आलेले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी हुशार व मेहनती होत आहे. बाहेर जिल्ह्यातून भाजीपाला आवकपेक्षा निर्यात अधिक होत आहे. याकरिता कृषी विभागाचे सहकार्य मिळत आहे.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी, भंडारा