ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांचा मागासप्रवर्गातील जागांवर निवडणुकीला स्थगिती देताच ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. निवडणुकीवर बहिष्काराची घाेषणा हाेऊ लागली. या घाेषणेमुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच ही निवडणूक हाेणार की संपूर्ण निवडणुकीला स्थगिती मिळणार याबाबतही संभ्रम कायम आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. विविध पक्षांसह इच्छुकांनी नामांकन दाखल केले. मात्र, नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर राेजी सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्य निवडणूक आयाेगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. तसेच तीन नगर पंचायतींच्या १२ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. आरक्षणच नाही तर मतदान नाही, अशी थेट भूमिका घेतली.भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. बहुसंख्य असलेल्या या घटकाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर काय? असा प्रश्न आता या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी नामाप्र प्रवर्गातून १०७, तर पंचायत समितीसाठी २६४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ही निवडणूक स्थगित झाली. त्यामुळे आता ३९ जागांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष आणि १६३ स्त्रियांचा समावेश आहे. तसेच पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास ९०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, या सर्वांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून अस्वस्थता पसरली आहे.आता निवडणूक हाेणार की रद्द हाेणार हाही संभ्रम उमेदवारात आहे. निवडणूक झाली आणि ओबीसी समाजातील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर या निवडणूकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यातच निवडणूक झाली तरीही सत्ता स्थापन हाेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण हाेवू शकते. त्यामुळे या उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे.
निवडणुकीतील रंगत संपली- ऐन भरात आलेल्या निवडणुकीची रंगत नागरिकांच्या मागासप्रवर्गातील जागांवरील निवडणूक स्थगित झाल्याने संपली आहे. निवडणुकी रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. निवडणूक रद्द झाली तर काय? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ६ डिसेंबरपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले हाेते. मात्र, आता केवळ निवडणूक स्थगित झाल्याच्या चर्चा दिसत आहेत. एकप्रकारे या निवडणुकीत सर्वांचा उत्साह गेल्याचे दिसत आहे.
१३ डिसेंबर राेजी हाेणार चित्र स्पष्ट- ३९ गट व ७९ गणांसाठी निवडणूक हाेत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तिथी १३ डिसेंबर आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट हाेईल. त्यानंतरच चिन्ह वाटप हाेईल व प्रचाराला सुरुवात हाेईल. मात्र, प्रचारादरम्यान ओबीसीचा मुद्दा मात्र कायम राहील.