रंजित चिचखेडे चुल्हाड (सिहोरा) खरिप हंगामात नदी पात्रातून चांदपुर जलाशयात पाण्याचा उपसा सोंड्याटोला सिंचन प्रकल्प करीत असतांना वीज बिलाची थकबाकी वाढल्याने वीज वितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली आहे. यामुळे प्रकल्प स्थळात अंधार पसरला आहे. विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाच्या निष्काळजीपणावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.अत्यल्प पावसाने हजेरी लावली आहे. नदीचे पात्र आणि नाल्यात पाणी अडविले जात आहेत. येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जाणार असल्याची वेळ येणार असल्याने ही उपाययोजना केली जात आहे. परंतु या प्रकारापासून वीज वितरण कंपनी बेफिकीर आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने चढ-उताराचा अनुभव घेतला आहे. विस्तीर्ण चांदपुर जलाशयात पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी आधीपासून बोंब सुरु केली आहे. बावनथडी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने ४ आॅगस्टला प्रकल्प स्थळात ६ पंप गृह सुरु करण्यात आले. याच कालावधीत नादुरुस्त ३ पंपगृह नागपुरच्या एका इंजिनिअरींग वर्कशॉप कंपनीला दुरुस्ती करीता देण्यात आले. यापैकी एका पंपगृहाचे काम पुर्ण झाले असून उर्वरीत २ पंप गृहाचे कामे प्रगती पथावर आहे. शेतकऱ्यांचे हितासाठी बुंद-बुंद पाण्याचा उपसा करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरु असतांना विज वितरण कंपनीने थकीत विज देयकांची आडकाठी आणली आहे. जलाशयात ८ फूट पाणी असतांना महिना भरात ३० फूट पाण्याची साठवणुक पर्यंत प्रकल्पाने मजल मारली आहे. प्रकल्पानेच शेतकऱ्यांना तारले आहे. यामुळे १२ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आली आहे. प्रकल्पावर ३४ लाखांचे वीज बिल देयक थकीत आहे.
सोंड्याटोला प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत
By admin | Published: October 12, 2015 1:15 AM