गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत शेती केली जाऊ शकते. यासाठी पाटबंधारे विभागाच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर काही गावांची निवड करून शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि योग्य मार्गदर्शन करीत तिन्ही हंगामांत शेती करण्यास परावृत्त करा, असा सल्ला आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
गोंदिया तालुक्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच कृषी विभागाच्या कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी पी. पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. एम. तुमडाम, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, राजू माथुरकर, गोंदिया वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल जयस्वाल, मनोज खोटेले, आर. के. कटरे, बाघ इटियाडोहचे उपविभागीय अभियंता व्ही. व्ही. निगम, महाबीजचे प्रतिनिधी ए. एन. गावंडे, पी. व्ही. कलेवार, डब्ल्यू. टेंभुर्णे उपस्थित होते.
आ. अग्रवाल म्हणाले रब्बी पिकात धानव्यतिरिक्त कलिंगड, खरबूज, लाखोळी, तूर, पोपट, जवस, उडीद, हरभरा, वाटाणा, इत्यादी पिकांचा, तर उन्हाळी पिकांत तीळ, करडई, मूग, उडीद, आदींचा समावेश करून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण तालुक्यात याचे प्रात्यक्षिक करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविली.
कृषी अधिकारी तुमडाम यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत काही गावांची निवड करून प्रयोग करण्याचे आश्वासन दिले.
५५०० मेट्रिक टन युरियाची मागणी
दरवर्षी खते आणि बियाण्यांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून नियोजन करून खरिपासाठी आवश्यक बियाणे व खते आधीच उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खरिपासाठी धानाचे महाबीजकडे ५५०० क्विंटल, तर खासगी कंपनीचे ५००० क्विंटल, अशी एकूण १०५०० क्विंटल मागणी केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली; तर खतांसाठी ५५०० मेट्रिक टन युरिया, तर १६७२६ मेट्रिक टन इतर खतांची मागणी केली आहे.
जैविक खतांचा वापर करणाऱ्यावर भर द्या
धान पिकावर सर्वाधिक मावा, तुडतुडा, पतंग अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून रासायनिक उपचारांपेक्षा जैविक उपचार जास्त उपयुक्त असून, यासाठी कामगंध सापळा, निंबोळी अर्क, मेटारायझियम, ट्रायकोकार्ड व जैविक कीटकनाशकांचा वापर सोयीस्कर असल्याचे यांच्या वापरातून निदर्शनात आले आहे, तसेच शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर उपाययोजना कशी करता येईल यासाठी वेळोवेळी पत्रकार परिषद, प्रेस नोट, पत्रके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या.