पोलिसांचा तगडा बंदोबस्त
वरठी :
विविध मागण्यांसाठी सनफ्लॅग कामगार संघटनांनी बेमुदत संप पुकारले आहे. संपाचा दुसरा दिवसही तणावात गेला. शेकडो कामगार कालपासून गेट बाहेर आहेत. खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. त्यांनी कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात चर्चा घडवून आणली. दरम्यान कामगाराच्या मागण्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने दोन्ही दिवसाच्या चर्चा निष्फळ ठरल्या. सनफ्लॅग व्यवस्थापन मागण्याबाबत उदासीन असल्याने संप संपण्याची आशा मावळली आहे.
सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात अनेक दिवसापासून धुसफूस सुरू होती. कामगाराच्या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने त्रस्त कामगार संघटनांनी संप पुकारले. याबाबत रीतसर पत्र व्यवहार करून मागण्याबाबत आग्रही भूमिका जाहीर करण्यात आली. पण सनफ्लॅग व्यवस्थापनाने मागण्या फेटाळून लावल्या. पत्रव्यवहार करूनही चर्चेला बोलावत नसल्याची तक्रार कामगार संघटनांनी केली आहे. कामगाराच्या मागण्याबाबत सनफ्लॅग व्यवस्थापन तडजोड करण्यास तयार नसल्याने अशांतता आहे.
संपाच्या पहिल्या दिवशी आमदार राजू कारेमोरे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली होती. आज दुसऱ्या दिवशी खासदार सुनील मेंढे व कामगार संघटनेचे कायदेशीर सल्लागार मिलिंद देशपांडे यांच्यासह इतर कारखान्यातील कामगार संघटनेचे पदाधिकारी मनोहर उजवणे, उदय सिंग व लिल्हारे उपस्थित होते. यावेळी त्यांनी कामगार संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुद्दे समजून घेतले. यावेळी खासदार सुनील मेंढे, व्यवस्थापनाचे दळवी, सतीश श्रीवास्तव व कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष विजय बांडेबुचे, महासचिव मिलिंद वासनिक, उपाध्यक्ष विकास बांते, सहसचिव अमोद डाकरे, रवींद्र बोरकर कंत्राटी कामगार संघाचे मोहम्मद जावेद, तारिकराम रामटेके यांची बैठक घेऊन मुद्देसूद चर्चा करण्यात आली. पण सनफ्लॅग व्यवस्थापन मुद्यांना बगल देत असल्याने चर्चा निष्फळ आटोपती घ्यावी लागली. सध्या संप जैसे थे त्या परिस्थितीत सुरू राहणार असल्याची घोषणा कामगार संघटनांनी जाहीर केले.
शेवटपर्यंत कामगाराच्या पाठीशी राहू- खासदार सुनील मेंढे
कामगाराच्या मागण्या योग्य असून त्यावर टोकाची भूमिका घेण्याची वेळ व्यवस्थापनामुळे आली. हक्काच्या मागण्यासाठी कामगारांना रस्त्यावर यावे लागणे उचित नाही. सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार कामगाराच्या मागण्या पूर्ण करणे आवश्यक आहे. सनफ्लॅगच्या व्यवस्थापनाच्या अलीकडे तक्रारी वाढल्या आहेत. आपल्या लोकांचे पोट आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही. व्यवस्थापनाला होणार नफा हा कामगाराच्या घामाचे फळ आहे. कामगारांच्या मागणीसाठी आपण शेवटपर्यंत कामगार यांच्यासोबत असल्याचे आश्वासन खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी दिले.
पोलिसांची अतिरिक्त कुमक
संपामुळे गावातील वातावरण तापले आहे.
बॉक्स
कामगारांत प्रचंड रोष
व्यवस्थापन अडून असल्याने कामगारांत प्रचंड रोष आहे. कंपनी पूर्णतः बंद असल्याने व्यवस्थापन मग्रूर झाले आहे. सध्या येथे ३८ पोलीस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तात आहेत. अजून ४ अधिकारी यांच्यासह ४६ पोलीस जवानांची मागणी सनफ्लॅग व्यवस्थापनाने केली आहे. सनफ्लॅग कंपनीला छावणीचे स्वरूप आले आहे. सध्या संघर्ष नाही. पण कामगार दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत.
कामगारांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न
संपाच्या काळात कामगारांना ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार काल अचानक पुढे आला आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या मध्यस्थीने आयोजित बैठकीत कामगार नेत्याचे फोन खणखणत होते. फोनवर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून सनफ्लॅग व्यवस्थापनाने काही कामगारांना ओलीस ठेवले असून सुट्टी देत नसल्याचे सांगितले. सदर घटना बैठकीत उपस्थित पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. लगेच त्यांच्याशी फोनवर संपर्क करवून बोलणे करून देण्यात आले. यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. बाहेरून कामगार जाणे बंद असल्याने अखेर त्यांना व्यवस्थापन उशिरा सोडले.