भंडारा : शेतीच्या हिस्सेवाटणीवरून सुरू असलेल्या वादात लहान भावाने मोठ्या भावासह वहिणीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्याची घटना तुमसर तालुक्यातील खापा येथील आंबेडकर वाॅर्डात शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. डोक्यावर कुऱ्हाडीचे वार लागल्याने भावाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले आहे.
अजाबराव नत्थू भोयर (३४) आणि निशा अजाबराव भोयर (३०) दोघे राहणार आंबेडकर वाॅर्ड खापा अशी जखमींची नावे आहेत. तर खुशाबराव नत्थू भोयर (३०) रा.खापा असे आरोपी भावाचे नाव आहे. खापा येथे भोयर परिवारातील तीन भाऊ एकाच घरात स्वतंत्र राहतात. तिघांचेही लग्न झाले आहे. अशातच अजाबराव आणि खुशाबराव यांच्यात गत काही दिवसांपासून शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेला होता.
शनिवारी सायंकाळी अजाबराव घरी पूजा करीत असताना खुशाबरावने हातात कुऱ्हाड घेऊन भाऊ अजाबराववर हल्ला केला. हल्ला होत असताना अजाबरावची पत्नी निशा मध्ये आली. त्यावेळी तिच्यावरही कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले. अजाबरावच्या डोक्यावर तीन ते चार कुऱ्हाडीचे घाव लागल्याने तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला व निशाला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अजाबरावला नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आली. तर पत्नी निशावर तुमसर येथे उपचार सुरू आहेत.
भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर खुशाबराव थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. आपण भावावर हल्ला केल्याचे सांगत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन याप्रकरणी भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार नितीन चिंचोळकर करीत आहेत.
पूजा करताना साधला डाव
अजाबराव हा परमात्मा एक सेवकचा सेवेकरी आहे. शनिवारी सायंकाळी तो विनंती पूजा करीत होता. त्याच्याच बाजूला त्याची पत्नी निशाही होती. ही संधी साधत खुशाबरावने थेट हातात कुऱ्हाड घेऊन अजाबराववर हल्ला केला. काय होत आहे हे कळायच्या आत निशा मधात आली. तिच्यावरही कुऱ्हाडीने वार केला. या घटनेने खापा येथे एकच खळबळ उडाली असून शेतीचा वाद कोणत्या थराला गेला यावर चर्चा होती.