शहरातील औद्यागिक वसाहतमधील प्रकार : माहितीच्या अधिकारात लपविली माहितीभंडारा : दाट लोकवस्तीच्या क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यावर २० फूट लांबीची सुरक्षा भिंत आहे. ही भिंत अतिक्रमणात असल्याचे नगर रचनाकार आणि मूल्यनिर्धारण व भंडारा औद्योगिक सहकारी वसाहती संस्थेने मान्य केल्यानंतरही अतिक्रमण पाडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दोन दशकांपासून टाळाटाळ सुरू आहे. राजकिय पाठबळामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा खेळखंडोबा सुरू आहे. ही भिंत पाडावी आणि आम्हाला न्याय द्यावा, या मागणीला घेऊन येथील नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. हा प्रकार शहरातील तकिया वॉर्डातील औद्यागिक वसाहतमधील आहे. माहितीनुसार, तकिया वॉर्ड परिसरात औद्यागिक वसाहत आहे. जी सध्या दिवसागणिक रहिवासी कॉलनीचे स्वरूप घेत आहे. जवळपास ३० वर्षांपूर्वी या औद्यागिक वसाहतीच्या निर्माणाधीन रूपरेषेत तकिया दरबार चौकातून वसाहतमध्ये जाण्यासाठी ५० फूट रूंदीचा रस्ता आहे. मात्र मैदा मिल नजिकच्या भुखंडाजवळ हा रस्ता सुरक्षा भिंत बांधून बंद करण्यात आला आहे. औद्यागिक वसाहतीसह समृद्धी नगर, आॅफीसर कॉलनी, म्हाडा कॉलनी परिसरातील रस्त्याची रूंदी ३० फूटांची आहे. औद्यागिक वसाहतीत स्व:तच्या लाभाकरिता या कॉलनीकडे जाण्यासाठी हा महत्वाचा रहदारीचा मार्ग भिंत बांधून कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.मागील दोन दशकापासून ही समस्या कायम असताना येथील नागरिकांनी ही अतिक्रमित भिंत पाडण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. दरम्यान काळात सदर अतिक्रमीत भिंत व रस्त्याचा वाद न्यायालयात असल्याची बाब समोर करण्यात आली. ती बाबही बनावट असल्याचे स्थानिक नागरिकांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. एवढेच नव्हे तर नगर रचनाकार विभागाने सदर भिंत अतिक्रमित असून ती पाडण्याची सुचना नगर पालिका प्रशासनाला १८ वर्षांपूर्वी दिली होती. यासंदर्भात येथील नागरिकांनी मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांची भेट घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अतिक्रमण निर्मूलनाची मागणी केली. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भितींची पाहणी केली. विशेष म्हणजे सदर अतिक्रमण निर्मूलनासाठी येथील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये मनोहर उजवणे, लक्ष्मीकांत थोटे, तुकाराम बावनकर, सुभाष सेलुकर, श्रीपत भुरे, मनोहर पारधी, पी.सी.मेश्राम, आत्माराम कोरे, जे.के.अनकर, विश्वनाथ हलमारे, भोजराम शेंडे, राजेश तिवारी, संतोष गायधने, पराग तरोणे आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)माहिती अधिकारातही दिशाभूलयासंदर्भात येथील एका व्यक्तीने माहिती अधिकारातंर्गत माहिती मागितली असता, त्यांना दीड महिना कार्यालयात चकारा माराव्या लागल्या होत्या. ‘ही माहिती आपण मागू शकत नाही, अपील करा, नंतर पाहू..’ अशी उत्तरे देण्यात आली. उत्तर - दक्षिण हा रस्ता मोकळा करून दिल्यास औद्यागिक वसाहत ते म्हाडा कॉलनी परिसर एकमेकाला थेट जोडला जावू शकतो. असामाजिक तत्वांचा नागरिकांना फटकासदर भिंत पाडण्यासाठी दिशानिर्देश असतानाही दोन दशकापासून का टाळाटाळ करण्यात येत आहे. नगर पालिकेचे तत्कालिन अधिकाऱ्यांनी प्रकरण का दडपले? हा प्रश्न संशय निर्माण करणारा ठरला आहे. भिंत न पाडण्यासाठी अन्य दिग्गजांनी प्राण पणाला लावल्याने अतिक्रमण आजही निघालेले नाही. तकिया दरबार चौकापासून असलेल्या दुसऱ्या बाहेरील मार्गाने समृद्धी नगर, म्हाडा कॉलनी, आॅफीसर कॉलनीला जावे लागते. या मार्गावर सायंकाळनंतर असामाजिक तत्वांचा वावर असतो. याचा त्रास सामान्य नागरिकांसह महिला व तरूणींना सहन करावा लागतो. याच परिसरात काही महिन्यांपूर्वी एका महिलेची भर दिवसा निर्घुण हत्या करण्यात आली होती.
अतिक्रमण पाडण्यासाठी नगरपालिकेची टाळाटाळ
By admin | Published: December 04, 2015 12:48 AM