जांब (लोहारा) : तुमसर तालुक्यातील लोहारा येथील नळ योजनेच्या वीज पुरवठ्याचे विद्युत बिल ग्रामपंचायतने भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित केला आहे. विद्युत विभागाने नळ योजनेचे कनेक्शन कापल्याने लोहारा येथील महिलांची पावसाळ्याच्या दिवसात वणवण भटकंती सुरू आहे. यामुळे महिला वर्गात असंतोष पसरला आहे. लोहारा येथील नळयोजना सुरळीत सुरू होती. परंतु ग्रामपंचायतीने नळ योजनेच्या कनेक्शनचे विद्युत बिल काही महिन्यांपासून भरले नसल्याने विद्युत विभागाने २१ जूनला कनेक्शन कापले. लोहारा येथील नळयोजना बंद झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत असल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लोहारा येथील नळयोजना त्वरित सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. नळयोजना त्वरित सुरु झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
लोहारा येथील नळ योजनेचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:23 AM