साकोली : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भंडारा (साकोली शाखा), नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, जिल्हा शाखा, भंडारा यांच्यावतीने जादूटोणाविरोधी कायद्याची पत्रके वाटप करण्यात आली.
दरवर्षी भंडारा जिल्ह्यातील कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रेवर नेफडोतर्फे पर्यावरण, मानवता व इतर उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यात्रा सीमित होती. ज्या ठिकाणी यात्रा भरते, त्या ठिकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा नेफडो, साकोलीच्या वतीने वृक्षारोपण केले होते. त्या झाडांची काळजी घेण्याबाबत यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यात आले.
फिरतांना मास्कचा वापर करा, चालताना योग्य अंतर ठेवा, नियमित हात धुवा, इत्यादी सूचना देण्यात आल्या. सोबतच जादुटोणाविरोधी कायद्याची पत्रके वाटप करण्यात आली. अध्यक्षस्थानी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष यशवंत उपरीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डी. जी. रंगारी, साकोली तालुका अध्यक्ष के. एस. रंगारी, यशवंत डोंगरवार, युवा संघटक अनिल किरणापुरे व नेफडोचे सदस्य यावेळी उपस्थित होते.