भंडारा : लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे सान्वी बिसनकर या लहान बालिकेच्या वाढदिवसाला अमाप खर्च न करता तोच निधी विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य वाटपावर खर्च करण्यात आला. याप्रसंगी नंदकुमार बिसनकर यांनी स्वतः शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले. उपस्थित मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बिसनकर यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींची समाजाला आज खूप गरज आहे. सामाजिक बांधीलकी व समाज जागृती लक्षात घेत गरीब व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, याची तळमळ आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने बिसनकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मिरेगाव येथे शालेय साहित्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:39 AM