मंगळवार रोजी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,आमदार रोहित पवार व शिक्षक बदली धोरण अभ्यास गटाचे प्रमुख आयुष प्रसाद यांची भेट घेऊन शिक्षक बदली धोरण या संबंधात सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने अंतरजिल्हा बदलीमध्ये आपापसात बदलीस संधी द्यावी, शून्य बिंदू नामावली धरून बदल्या कराव्यात, १० टक्के रिक्त पदाची अट न ठेवता बदल्या कराव्यात, रिक्त जागी नवीन शिक्षक भरती करून भरावीत, तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी पूर्वी ना हरकत दिलेल्या शिक्षकांचा प्राधान्याने विचार करावा, तसेच जिल्हा अंतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्या २० टक्केपेक्षा जास्त नसाव्यात, खो पद्धत बंद करून सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या कराव्यात, बदली पात्रतेसाठी ३० मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरावी, एका शाळेवर पाच वर्षे सेवा पूर्ण झाल्यावरच प्रशासकीय बदली दर तीन वर्षे पूर्ण झाल्यावर विनंती बदली करावी. संवर्ग एक मधील शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून बदलीसाठी बनावट प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या शिक्षकांवर व प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, २०११ व २०१२ आणि २०१८ व २०१९ विस्थापित व रँडम राऊंडमध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांची बदली करावी, एनआयसीमध्ये गैरप्रकार प्रकार करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या बाबत भंडारा जिल्हा संघाने अनेक दिवसांपासून राज्यसंघाकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, सुधीर वाघमारे, राजेश सूर्यवंशी, मुकेश मेश्राम, राजू सिंगनजुडे, संजीव बावनकार,रमेश काटेखाये,दिलीप बावनकर,राधेश्याम आमकर, राजन सव्वालाखे,शंकर नखाते नरेश देशमुख,सेवकराम हटवार,रमेश लोणारे,रजनी करंजेकर, दिलीप गभने, भाष्कर खेडीकर, अशोक मेश्राम, विनायक मोथरकर व सर्व पदाधिकारी यांनी राज्य संघाचे आभार व्यक्त केले.
जिल्हा व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:42 AM