लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा/पालांदूर : काेराेना संकटाच्या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या २४ हजार ८३९ शेतकरी सभासदांना महिनाभरात १३७ काेटी २६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा झाली. त्यामुळे काेराेना संकटात शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षी पीक कर्जात अग्रेसर राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदाही शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण सुरू केले आहे. काेराेना संकटावर मात करीत आणि सर्व नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्यात येत आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी २८० काेटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. जिल्हा बँकेच्या ३९ शाखांमधून महिनाभरापासून पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २४ हजार ८३९ शेतकऱ्यांना १३७ काेटी २६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. हे कर्ज उद्दिष्टाच्या ४८ टक्के आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्हा बँकेने काेराेना संकटात उद्दिष्टापेक्षा अधीक पीक कर्ज वितरित केले हाेते.सर्वत्र काेराेनाचे संकट घाेंगावत आहे. अशा स्थितीत आगामी हंगामासाठी पीक कर्ज मिळेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत हाेती. मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी या काेराेना संकटात याेग्य नियाेजन करून शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना तत्परतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी त्यांनी माेहीम उभारली. अवघ्या महिनाभरात उद्दिष्टाच्या अर्धे पीक कर्ज वितरित करण्यात आले. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा हाेत असल्याने माेठा दिलासा मिळाला आहे. काेराेनासंकटात शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्यापासून वाचविण्यात आले आहे. पीक कर्ज घेत ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ० व्याज दराचा लाभ देण्यात येत आहे. ओलिताखालील शेतकऱ्यांना प्रति एकर २१ हजार ७५० रुपये तर काेरडवाहू शेतकऱ्यांना १९ हजार रुपये पीक कर्जाचे प्रमाण ठरविण्यात आले आहे.लाॅकडाऊनच्या काळात कर्मचारी अधिकाऱ्यांनी जाेखीम पत्करून निर्धारित वेळेपेक्षा अधिक काम केले, हे विशेष.
पालांदूर सेवा सहकारी संस्था अग्रेसर- पीक कर्ज वाटपात लाखनी तालुक्यातील पालांदूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अग्रेसर आहे. ३१ मार्चपर्यंत पीक कर्जाची वसूली ९३.२३ टक्के केली. ४४२ शेतकऱ्यांना ० टक्के व्याज दराचा लाभ मिळाला. १५ एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून, ३०८ शेतकऱ्यांना एक काेटी ४५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष विजय कापसे व गटसचिव सुनील कापसे यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १५ एप्रिलपासून पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत पीक कर्जाच्या वितरणाची माहिती घेत बँकेत हाेणारी गर्दी टाळावी. सेवा सहकारी संस्थांनी आपले ताळेबंद बँकेत सादर केल्याशिवाय दरखास्त पाठवू नये. काेराेनाचे नियम पाळून बँकिंग व्यवहाराला सहकार्य करावे.- सुनील फुंडे,जिल्हा मध्यवर्ती बॅंक, भंडारा