सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने आजाराचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लोकांना पैशाची गरज भासत असतानाही येथील कार्यरत बँक कर्मचारी ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक देत असतात. आजारी व्यक्तीने पैसे काढण्यासाठी पाठविल्यास त्या व्यक्तीला प्रथम हजर करण्यास सांगितले जाते. वयस्क, वृद्ध, संजय गांधी व वृद्ध पेन्शन, शेतकरी आपले पैसे काढण्यासाठी गेल्यास गेटवर त्यांना येथे अपमानजनक वागणूक दिली जात आहे. जिल्हा सहकारी बँक ही शेतकरी व सामान्य लोकांची बँक म्हणून ग्राहक तिच्याकडे पाहत असताना ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सध्या कार्यरत कर्मचारी नाहक करीत आहेत. येथील व्यवस्थापक भोगे हे सध्या सुटीवर असल्याने येथील कर्मचारी ग्राहकांना त्रास देत असल्याचे सांगितले जाते आहे. कर्मचारी वर्ग बाहेरून येणे जाणे करीत असल्याने दुपारी १ वाजतानंतर कोणालाच खात्यातील रक्कम देत नाही. आलेल्या ग्राहकांना परत पाठविले जाते. बँकेची वेळ ११ ते २ असल्याने ही वेळ अत्यल्प आहे. किमान २ वाजेपर्यंत तरी रक्कम देणे आवश्यक आहे. दुसरीकडे कोंढा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत २ वाजेपर्यंत व यानंतर इमारतीत असलेल्या ग्राहकांनाच रक्कम दिली जाते. येथे प्रभारी असलेले व्यवस्थापक भोंगे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता मला वेळ नाही, असे ते सांगतात. यासाठी वरिष्ठ बँक संचालक मंडळाने या ग्राहकांच्या होणाऱ्या त्रासाची चौकशी करून येथे ग्राहकांशी उद्धट वागणाऱ्या व आजारी व्यक्तींना पैसे न देणाऱ्या प्रभारी व्यवस्थापक तसेच रोखपाल यांची तात्काळ बदली करण्याची मागणी ग्राहकांनी संचालक मंडळाकडे केली आहे.
जिल्हा सहकारी बँक शाखेत ग्राहकांना होतोय नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:57 AM