लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आयुष्यात कायम अंधार असलेल्या अनाथ निरागस बालकांच्या जीवनात यंदाची दिवाळी आशेचा किरण घेवून आली. खुद्द जिल्हाधिकारी दिवाळीच्या फराळासह आणि भेटवस्तू घेऊन अनाथाश्रमात पोहचले. बालकांसोबत गप्पा मारत जमीनीवर बसून त्यांच्यासोबत भोजनही केले. एवढेच नाही तर पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. हा हृदयस्पर्शी सोहळा सायंकाळी भंडारा तालुक्यातील आमगाव येथील अनाथाश्रमात रंगला होता. तब्बल तीन तास जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांसोबत घालवून त्यांच्यासोबत आनंद वाटला. महिला व बालविकास विभागांतर्गत आमगाव येथे अनाथाश्रम आहे. गत २० वर्षापासून गंगाधर भालाधरे या अनाथ मुलांचे पालन पोषण करतात. सहा ते १८ वयोगटातील तब्बल २१ मुले-मुली येथे आहेत. सर्व सुविधा आणि मायेची पाखर येथे मिळत असली तरी दिवाळी सणाची कायम हुरहुर या निरागस बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. हेच संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी हेरले. सोमवारी सायंकाळी त्यांच्या वाहनाचा ताफा थेट आमगावच्या अनाथाश्रमात पोहचला. त्यावेळी त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे. समाज कल्याण उपायुक्त आशा कवाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत बालकांच्या भोजनाचे सर्व साहित्य घेतले होते. एवढेच नाही तर दिवाळीचे फटाके, भेटवस्तू सोबत आणली होती. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या बालकांसोबत फटाके फोडून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. मुलांच्या खेळण्यासाठी जाळी आणि व्हॉलीबॉलही भेट देण्यात आला. यावेळी या बालकांनी नृत्य. गाणी सादर करुन जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपल्या कलेचे प्रदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी या मुलांसोबत जमीनीवर बसून भोजन घेतले. यावेळी अनाथाश्रमातील मुलांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी मुलांना सांगितले. दिवाळीच्या पर्वात बालकांच्या जीवनात आनंद पेरण्याचा हा उपक्रम अनेकांना आदर्श देऊन गेला. यावेळी स्मृती लोणारे या बालिकेचा सर्वांनी वाढदिवस साजरा केला. केक कापुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्मृतीला आपल्या हाताने केक भरविला. तेव्हा वातावरण भावविभोर झाले. कधीही वाढदिवस साजरा न झालेली स्मृती या प्रसंगाने भावना विवश झाली होती. तिला काय करावे हेही सुचत नव्हते. उपस्थितांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
साहेब, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी काय केलेदिवाळीचा सोहळा साजरा करीत असताना सुरुवातीला बालके अबोल दिसत होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शैलीने त्यांना बोलते केले. बालके एवढी खुलत गेली की एका बालकाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. तुम्ही कलेक्टर कसे झाला. तुम्हाला समस्या आल्या नाही काय असे विचारले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपण कलेक्टर कसे झालो आणि समस्यावर कशी मात केली हे उदाहरणासह सांगितले. जीवनात कोणत्याही समस्या आल्या तरी न डगमगता त्याचा सामना करा असा संदेश त्यांनी दिला.