सेंद्रीय शेतीची पाहणी : शाश्वत शेती अभियानात सहभागी शेतकऱ्यांशी संवादगोंदिया : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे सरळ शेताच्या बांधावर दाखल झाले. तिरोडा तालुक्यातील बिहिरीया या गावाला भेट देवून त्यांनी तेथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, सरपंच प्रमिला पटले, उपसरपंच मदन पटले उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सेंद्रीय शेती करणाऱ्या टेकचंद जमईवार, नंदिकशोर जमईवार, रेवाशंकर पटले, दिनेश जमईवार यांच्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी चर्चा केली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सेंद्रीय व रासायनिक शेतीतील पिकाची तुलना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. सेंद्रीय शेतीतील पिकामध्ये किड व रोगाचा प्रादुर्भाव नगण्य प्रमाणात असून पिकही जोमदार असल्याचे तसेच या शेतीतील पिकासाठी कीटकनाशक व खताचा खर्च नसल्याचे त्यांनी सांगितले. या शेतीतून यावर्षी भरघोस उत्पन्न मिळणार असल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले. उलट त्यांच्याकडे असलेल्या रासायनिक शेतीच्या पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असून यावर नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर करण्यात आल्यामुळे या शेतीसाठी खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी या गावातील सेंद्रीय शेती व रासायनिक शेतीचे पीक बघितले. त्यांना सेंद्रीय शेतीतील पीक अत्यंत चांगल्या स्थितीत दिसून आले. सेंद्रीय शेतीचे प्राथमिक निष्कर्ष आश्वासक असून उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यताही त्यांनी विशद केली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास यामुळे मदत होणार असून धानाला चांगला भावही मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पीक पाहणीनंतर सांगितले.यावेळी त्यांनी सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरही शेतकऱ्यांशी चर्चा केली. सेंद्रीय प्रात्यक्षिक कापणीच्यावेळी प्रत्यक्ष भेट देण्याची सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी शेतावर
By admin | Published: November 01, 2016 12:40 AM