लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या तब्बल १५ महिन्यांनंतर शुक्रवारी भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला. मोहाडी तालुक्यातील एकमेव ॲक्टिव्ह रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त होण्याचा मान भंडारा जिल्ह्याला मिळाला. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसह नागरिकांच्या सहकार्याने यश संपादित करता आले.राज्यात गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात २७ एप्रिल २०२० रोजी भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथे पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. पहिली लाट ओसरल्यानंतर रुग्ण संख्या कमी झाली असली तरी संसर्ग मात्र कमी झाला नव्हता. त्यातच १२ जुलै २०२० रोजी कोरोनाचा जिल्ह्यात पहिला बळी गेला. दरम्यान, नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. अचानक मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. जून महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना लाटेचा प्रभाव कायम होता; मात्र त्यानंतर १८ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम होता. १२ एप्रिल रोजी सर्वाधिक एक हजार ५९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तर १ मे रोजी सर्वाधिक ३५ मृत्यूची नोंद झाली होती.प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीसोबत योग्य नियोजन व सामूहिक प्रयत्नांमुळे दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात यश मिळविले. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध, त्यांची तपासणी, चाचणी आणि वेळेवर उपचार या सूत्राचा अवलंब केला. त्यामुळेच शुक्रवार, ६ ऑगस्ट रोजी कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होऊन घरी गेला. शुक्रवारी ५७८ व्यक्तींची चाचणी केली असता, एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला.
चार लाख ३९ हजार व्यक्तींची चाचणी
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत चार लाख ३९ हजार ८३२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४९ हजार ८०९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी ५८ हजार ६७३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर कोरोनाने ११३३ व्यक्तींचा बळी घेतला. जिल्ह्यात सध्या एकही कोरोना रुग्ण शिल्लक नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के असून, मृत्यू दर १.८९ टक्के आहे.
ॲक्टिव्ह रुग्ण पोहोचले होते १२ हजारावर - कोरोना संसर्गाची पहिली लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली होती. १५ फेब्रुवारी रोजी क्रियाशील रुग्णांचा आकडा ९७ पर्यंत खाली आला होता; परंतु दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार उडाला. १८ एप्रिल रोजी तर तब्बल १२ हजार ८८७ ॲक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात होते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक मोहोल्ल्यात कोरोना रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी रुग्ण बरा होण्याचा दर ६२.९८ वर होता. तो आता ९८.११ वर पोहोचला आहे. १२ एप्रिल रोजी ५५.७३ टक्के असलेला पॉझिटिव्हिटी रेट शुक्रवारी शून्यावर आला आहे.
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाचे सामूहिक प्रयत्न व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. जिल्ह्यात क्रियाशील रुग्ण शून्य असले तरी पुढच्या काळात सतर्कता बाळगावीच लागेल. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियमाचे जबाबदारीने पालन करणे आवश्यक आहे.-संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा.
आज जिल्ह्यात क्रियाशील रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. सामूहिक प्रयत्नांचा हा परिणाम आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, कोविड प्रोटोकॉलचे पालन केल्यास या आजारापासून दूर रहाणे शक्य आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग तयारी करीत आहे. -डॉ. आर. एस. फारुखी, जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा.