असभ्य वर्तवणुकीचा ठपका: आमदारांनी केली आरोग्य मंत्र्यांकडे तक्रारभंडारा : पहेला येथील बयान गोपनीय भंग प्रकरण, आष्टी येथील गर्भवती महिलेची नसबंदी प्रकरण, लोकप्रतिनिधी-कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक अशा विविध वादग्रस्त प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे अडकले आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीमुळे आरोग्य विभाग चर्चेत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना पाठविले आहे.पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणुकीमुळे रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर असताना आरोग्य यंत्रणेने सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा सुरू आहे. वरिष्ठ अधिकारीच कर्तव्य चोखपणे बजावत नसल्याने आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी येथील गर्भवती महिलेची नसबंदी प्रकरण, पहेला येथील बयान गोपणीय भंग प्रकरण, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणुकीचा विषय सध्या गाजत आहे. ही प्रकरणे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचेच सिद्ध होत आहेत. आरोग्य विभागाच्या समस्या आवासून असल्यातरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्याविषयी काही सोयरसुतक नाही. त्यांच्याविषयी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात यावे, अशी मागणी आमदार अॅड. अवसरे यांनी पत्रातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी दिवसभर व्यस्तआमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी सदर प्रतिनिधीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९७५४९३१०० वर अनेकदा संपर्क साधाला. मात्र 'तुम्ही डायल केलेला क्रमांक सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा' असाच संदेश येत होता.बयाण गोपनीय भंग प्रकरण गुलदस्त्यातभंडारा तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीचा मुहूर्त अद्यापही गुलदस्त्यात आहे. चौकशीला बराच विलंब होत असल्यामुळे 'त्या' अधिकाऱ्यांना बड्या अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याची शक्यता बळावली आहे. चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची उदासिनता संशयाला बळ देत असून याकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: May 27, 2016 12:52 AM