भंडारा : शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरावर, विभाग, जिल्हा, तालुका स्तरांवर पीक स्पर्धा घेण्यात येतात. यात जिल्ह्यातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
पीक स्पर्धेतील गुणवंत शेतकऱ्यांचा जिल्हास्तरावर १ मे कामगार दिनानिमित्ताने पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक आलेल्या भंडारा तालुक्यातील चिखली येथील जीवन विष्णुदास हटवार यांचा हेेक्टरी ४६ क्विंटल उत्पन्न घेतल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पवनी तालुक्यातील कोदुर्ली सुधाकर भुरे यांचा द्वितीय, तर पवनी तालुक्यातील पाथरी येथील नंदलाल भुरे यांचा सर्वसाधारण गटातून तृतीय क्रमांक आला; तर आदिवासी गटातून लाखनी तालुक्यातील सिंदीपार येथील श्यामराव मडकाम यांचा प्रथम, तर पवनीतील खापरी भुयार येथील रवींद्र दडमल द्वितीय, तर खापरी भुयार येथील हरी दडमल यांचा तृतीय क्रमांक आल्याने पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमासाठी आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी कदम, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, भंडाराचे एसडीएओ शांतीलाल गायधने, साकोलीचे एसडीओ पद्माकर गीदमारे, उपसंचालक अरुण बलसाने, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी योगेश मेहर, चंद्रशेखर कापगते, मंडळ कृषी अधिकारी एल.एम. मेश्राम, कृषी सहाय्यक रेणुका दराडे, प्रशांत रामटेके, एकनाथ पाखमोडे, अजय टांगले, कर्मचारी सविता डोरले, भंडारा तालुका भाजपा ग्रामीण महामंत्री विष्णूदास हटवार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांत शेतकरी विविध प्रयोग करतात. त्यामुळे उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे मनोबल वाढवणे हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले. जिल्हास्तरावर विजेत्यास प्रथम बक्षीस दहा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय ५०००; तर तालुका स्तरावर प्रथम ५००० द्वितीय तीन हजार, तर तृतीय दोन हजार रुपयांचे बक्षीस शेतकऱ्यांना देण्यात आले.
बॉक्स
भंडारा तालुक्याची पीक स्पर्धेत बाजी
कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या २०२०-२१च्या पीक स्पर्धेत जिल्हा स्तरावर भंडारा तालुक्यातील चिखली येथील जीवन विष्णुदास हटवार यांनी ४६.६३ क्विंटल हेक्टरी उत्पादन घेऊन पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यानिमित्ताने शेतकरी विष्णुदास हटवार यांचा पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्पादन खर्च कमी करून जिल्हाभरात उत्पादनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकरी विष्णुदास हटवार यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी हटवार यांचा गावात जाऊन गावकऱ्यांसमवेत सत्कार केला.
कोट
मी गेल्या तीन वर्षांपासून पीक स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यामुळे माझ्या शेती उत्पादनातही चांगली वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या तथा गावपातळीवर कृषी साहाय्यक रेणुका दराडे यांच्या मार्गदर्शनात बीबीएफ पद्धतीचा अवलंब केल्यानेच पीक स्पर्धेत माझा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी.
विष्णू हटवार
शेतकरी तथा भाजप ग्रामीण तालुका महामंत्री, भंडारा