कृती समितीचे आंदोलन मध्यस्थीनंतर स्थगित : जि.प. पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पुढाकार, ३१ मार्चपर्यंत समस्या सोडविण्याचे आश्वासनभंडारा : प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी, जिल्हा परिषद शिक्षकांनी गुरूवारपासून साखळी उपोषण सुरू केले. शुक्रवारला आंदोलनाचा दुसरा दिवस व जिल्हा परिषद सर्वसाधरण सभा होती. या सभेकरिता उपस्थित जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व अधिकाऱ्यांनी सभागृहातील कामकाज सुरू करण्यापूर्वी थेट उपोषण मंडपाला भेट देत शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांना ३१ मार्चपर्यंत समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर साखळी उपोषण तूर्तास स्थगीत करण्यात आले.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेकरिता उपस्थित असलेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी कामकाज सुरू होण्यापूर्वी थेट आंदोलनकर्त्यांच्या पेंडालमध्ये जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याची बहुदा जि. प. च्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग असावा. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपशिक्षणाधिकारी एम. ए. चोले, यांच्यासह सर्व विषय समिती सभापती शुभांगी रहांगडाले, विनायक बुरडे, नरेश डहारे, गटनेता अरविंद भालाधरे, जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, संदीप ताले, द्रुगकर, चंदू पिल्लारे यांची उपस्थिती होती. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी हे सर्व एकत्र मंडपात आल्याने खुद्द सभागृहच आंदोलनकर्त्यांकडे पोहचल्याने शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले असले तरी, ३१ मार्चपर्यंत समस्या निकाली काढल्या नाही तर, १ एप्रिलपासून आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला आहे.प्राथमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदविधर शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या विविध मागण्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. याबाबत प्रशासनाशी लढा देण्यासाठी जिल्ह्यातील आठही शिक्षक संघटना एकत्र येऊन त्यांनी शिक्षक कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून ६ आॅक्टोंबरला जिल्ह्यातील शिक्षकांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले होते. यावेळी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी रजा घेतल्याने शाळा बंद पडल्या होत्या. यानंतर आंदोलन चिघळल्याने शिक्षकांनी आंदोलन पुकारले होते. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकारातून मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे यांनी शिक्षकांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता याला आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही समस्या मार्गी लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक कृती समितीने गुरूवारपासून साखळी उपोषणाचे हत्यार उपसले. यावर आज शुक्रवारला तूर्तास तोडगा काढून ३१ मार्चपर्यं समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व मुबारक सय्यद, रमेश शिंगनजूडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, वसंत साठवणे या शिक्षक नेत्यांनी केले. या आंदोलनस्थळी सर्व शिक्षक संघटनांचे जिल्ह्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जि. प. सभागृहच उपोषण मंडपात पोहचते तेव्हा!
By admin | Published: March 18, 2017 12:28 AM