इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण स्वत: लोकांना भेटणार. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करणार. पोलीस खात्याला लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न आहे. अधिनस्त पोलिसांचे मनोबल उंचावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार, असे प्रतिपादन भंडाराचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या. भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी अधीक्षक अरविंद साळवे यांची नियुक्ती झाली. भंडाराशी परिचित असलेले अरविंद साळवे म्हणाले, कोणताही जिल्हा लहान मोठा नसतो. सर्वच ठिकाणी सारखीच आव्हाने असतात. भंडारा जिल्ह्याचा आपण अभ्यास करीत आहे. सर्वप्रथम आपण पोलीस खात्याला लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विविध पोलीस ठाण्यांना भेटी देताना त्या भागातील नागरिकांना भेटणार. त्यांच्या समस्या ऐकून घेणार. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. त्यातून पोलिसांची प्रतिमा निश्चितच उंचावेल आणि गुन्हेगारांच्या मनात धडकी भरेल, असे सांगितले.नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यभार सांभाळलेले पोलीस अधीक्षक साळवे भंडारा जिल्ह्यातील वाहतुकीकडे खास करून लक्ष देणार आहेत. ज्या शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो तेथील समस्यांचा आपल्याला अभ्यास आहे. त्यामुळे भंडारा शहरातील वाहतूक अवघ्या काही दिवसातच सुरळीत झाल्याचे दिसेल, असे त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे गुन्हे जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे आपल्या निदर्शनास आले. यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या मदतीने जनजागृती केली जाईल. तसेच तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अँटी ड्रग कॅम्पेन करणार असल्याचे अरविंद साळवे यांनी सांगितले.तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी भंडारा पोलीस दलाला चांगली शिस्त लावली. वेलफेअरच्या योजना प्रभावीपणे राबविल्या. त्यांच्या या योजना आणखी प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण संबंधितांना निर्देश देणार आहोत. पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठीही आपण पुढाकार घेणार असल्याचे साळवे यांनी सांगितले. पोलिसांनी कर्तव्यात कसूर करू नये आणि नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन साळवे यांनी केले.पोलीस अधीक्षक आहेत मेकॅनिकल इंजिनियरमुळचे वैदर्भीय असलेले अरविंद साळवे यांचे बालपण आणि शिक्षण वडीलांच्या नोकरीमुळे औरंगाबाद शहरात झाले. औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरमधून पदवी घेतली आहे. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त झाले. त्यांची सर्वप्रथम नियुक्ती वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, देसाईगंज आणि भंडारा येथे १९९९ मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य केले. २००८ साली अमरावतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम सांभाळल्यानंतर अमरावतीतच लाल लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक झाले. त्यानंतर नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. भंडारा येथे येण्यापूर्वी ते मुंबई येथे राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक होते. राज्यातील वीज चोरी थांबविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा झाली.
जिल्ह्यात पोलीस खात्याला लोकाभिमुख करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:16 PM
जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण स्वत: लोकांना भेटणार. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करणार. पोलीस खात्याला लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न आहे. अधिनस्त पोलिसांचे मनोबल उंचावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार, असे प्रतिपादन भंडाराचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ठळक मुद्देअरविंद साळवे : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार, नागरिकांना प्रत्यक्ष भेटणार