प्रत्यक्ष उपग्रह बांधणीची विद्यार्थ्यांना संधी
साकोली: डाॅ.ए.पी.जी. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड चॅलेंज २०२१ या डाॅ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन स्पेश झोन इंडिया आणि मार्टीन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या प्रकल्पामध्ये ७ फेब्रुवारीला भारतातील १ हजार विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात हेलीयम बलूनद्वारे प्रक्षेपण करून विश्वविक्रम, आशिया विक्रम, भारतीय विक्रम, असिस्टंट वर्ड विक्रम स्थापित करण्याचा मान भंडारा जिल्ह्यातील २७ विद्यार्थ्यांना मिळाला. ही भंडारा जिल्ह्यावासियांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ३९ उपग्रह बनवून या जागतिक विक्रमात सिंहाचा वाटा उचलला आहे. सदर प्रक्षेपण रामेश्वरम् येथून करण्यात आले.
नागपूर व पुणे या ठिकाणी सॅटेलाईट मेकींग कार्यशाळा १९ जानेवारीला घेण्यात आली. यात जिल्ह्यातील टीम सहभागी झाली होती. यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी उपग्रहाची बांधणी केली. यात भंडारा जिल्हा चमू समन्वयक प्रा. सहसराम बंसोड यांच्या मार्गदर्शनात पलोटी इंजिनिअरिंग सेंटर नागपूर येथे सहभागी झाली होती. महाराष्ट्रातर्फे प्रक्षेपण आधी तिरंगा फडकावित तिरंग्याला मानवंदना देत मनिषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी स्थळापर्यंत मार्च काढून सहभाग नोंदविला.
सदर प्रेक्षणस्थळी देशातील इस्त्रो येथील शास्त्रज्ञासह कलाम कुटुंबीय उपस्थित होते. स्पेस रिसर्च पेलोड क्युब्स चॅलेंज- २०२१ ही मोहीम हाती घेण्यात आली. या उपग्रहामार्फत पृथ्वीवर असलेल्या केंद्राशी कसा संपर्क येतो, ओझोन वायू थराचा अभ्यास, बी व बियांणे यांचा अभ्यास, हवेच्या वातावरणाचा सूक्ष्म अभ्यास, हवामानाचा अभ्यास हे उपग्रह करून विद्यार्थ्यांना अनुभूती देण्यास प्रेरणादायी ठरले असून विद्यार्थ्यांना या प्रकल्पातून विविध फायदे झाले आहेत. जागतिक पातळीवर नोंद होणाऱ्या प्रकल्पात सहभाग घेत उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची संधी स्वत: उपग्रह बनविण्याची संधी मिळाली आहे.
जागतिक, आशिया व इंडिया उपग्रह विक्रमासाठी भंडारा जिल्हा चमू सहभागी विद्यार्थी रज्जत सुदाम हटवार, अथर्व गायधने, पीयूष हुकरे, सोहम मांढरे, गुंजन सहसराम बंसोड, अंतरा मेश्राम, आर्या मेश्राम, प्रिन्स कोरे, सुमित कापगते, नंदीनी भावसर, छबील रामटेके, वैभव मस्के, पूर्वा भास्कर गिऱ्हेपुंजे, अर्णव गायधने, मिलिंद चौधरी, यश सेलोकर, इंद्रनिल बिश्वास, यशस्वी सार्वे, रामेश्वरम येथे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.