भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. प्रत्येक गावात तलाव आहे. पावसाळ्यात या तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यासाेबतच रस्त्यावरील खड्डे, तुंबलेली गटारे, पाण्याची डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच वातावरणात सातत्याने बदल हाेत असल्याने विविध आजारांनी डाेके वर काढले आहे. सर्दी, अंगदुखी, खाेकला, ताप, डिहायड्रेशन, अंगावर चट्टे, जिभेला चव नसने, प्लेट लेट कमी असणे असे रुग्ण आता वाढीस लागले आहे.
काेराेनामुळे नागरिक आधीच धास्तावलेले आहेत. जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण नसले तरी नागरिकांच्या मनात काेराेनाची भीती कायम आहे. त्यामुळे अनेकजण अंगावरच आजार काढताना दिसत आहे. घरीच गाेळ्या घेऊन आजार काढत असल्याचे दिसत आहे. यामुळे ही साथ वाढीस लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आणि बहुतांश सर्वच गावात असे रुग्ण दिसून येत आहे.
जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या जिल्हा आराेग्य यंत्रणेच्या वतीने जनजागृतीवर भर दिला जात असून, आराेग्य यंत्रणाही सक्षमपणे कामाला लागली आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात डेंग्यूच्या १५ रुग्णांची नाेंद
ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रकाेप वाढला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत ३३५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली हाेती. त्यात १५ रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. अनेकदा खासगी प्रयाेगशाळेत तपासणी केली जाते. तेथे डेंग्यूसदृश लक्षणे असली तरी डेंग्यू म्हणूनच सांगितले जाते. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. शासकीय मानकानुसार डेंग्यूची नाेंद आराेग्य विभाग करीत असते. परंतु खासगी प्रयाेगशाळेतील अहवालाने नागरिकांच्या भीतीत भर घातली आहे. आराेग्य विभाग याबाबत वारंवार सूचना देत असल्या तरी गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
बाॅक्स
अशी घ्या काळजी
डेंग्यू अथवा साथीचे आजार हाेऊ नये म्हणून नागरिकांनी गावातील गटारे, नाल्या वाहती करणे आवश्यक आहे. घराचा परिसर व गुरांचे गाेठे नेहमीच स्वच्छ ठेवावे. शेणखताचे खड्डे लांब अंतरावर असावे, घाणीच्या ठिकाणी मॅलेथियान किटकनाशक पावडराचे धुरळे करावी, घराच्या आसपास सांडपाणी साठवू देऊ नये. डासापासून बचावासाठी मच्छरदाणीचा उपयाेग करावा. आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळावा या उपाययाेजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे.
बाॅक्स
तत्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्या
१५ वर्षांखालील मुलांना अचानक ताप येणे, वर्तणुकीत बदल हाेणे, झटके व तत्काळ बेशुद्ध पडणे, अशी लक्षणे आढळून आल्यास सदरहू रुग्णाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
काेट
ग्रामीण भागात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आराेग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. कर्मचाऱ्यांमार्फत गावनिहाय सर्वेक्षण केले जात आहे. पाणी साठ्यांची तपासणी करुन शुद्धीकरणासाठी मार्गदर्शन केले जात आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी.
- डाॅ. आदिती त्याडी
जिल्हा हिवताप अधिकारी