भंडारा : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक व नगरपरिषद रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड १९ व लसीकरण जनजागृती अभियानांतर्गत राज्यस्तरीय व विदर्भस्तरीय निबंध, काव्य, घोषवाक्य, वक्तृत्व व नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आल्या.
कोविड काय आहे, कोविडच्या आरोग्यावरील आणि समाजावरील परिणाम, कोविड सुरक्षेविषयी उपाययोजना, लोकांनी घ्यावयाची काळजी, कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे सामाजिक चित्रण, त्यांचे रोजगार, नोकरी, शिक्षण यावर झालेले परिणाम आणि उपाययोजना, कोविड काळ अधिक दिवस राहिल्यास होणारे अपेक्षित परिणाम व लसीकरणाविषयी जनजागृती, लसीकरणाबाबत समज-गैरसमज लसीकरणाविषयी लोकांतील अनास्था दूर करण्याचे उपाय इत्यादी संबंधित विषयावर आधारित ही स्पर्धा होती.
या स्पर्धेत राज्यभरातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये युथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेने मानाचे स्थान प्राप्त केले. त्यात विदर्भ स्तरीय निबंध स्पर्धेत वायएसजे कलापथकाचा सदस्य सचिन करांडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला, तसेच निशा कुशवाह ही राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेमध्ये राज्यातून दहावा क्रमांक मिळविला व राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत वायएसजे कलापथक संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दुसर्या क्रमांकावर आला.
या कलापथकात भंडारा जिल्ह्यातील वैष्णवी खंगारे, वैष्णवी धांडे, राणी मराठे, निशा कुशवाह, योगेश शेंडे, पंकज पडोळे, हितेश राखडे, चैतन्य कांबळे, सचिन कारंडे, वैभव मेंढे व सुशांत नागदेवे यांचा समावेश होता.
आयोजित स्पर्धेमध्ये वायएसजे कलापथकाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यूथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद केसरकर आणि मार्गदर्शक डॉ.महेंद्र गणवीर व सतीश मोटघरे व संघटनेने कौतुक केले.