शासनाकडून राईस मिल मालकांना मिळणारे भरडाईचे दर तुटपुंजे असून वेळेवर मिळत नाही. तसेच यंदा धानाला कमी उतारा येत आहे. या कारणावरुन जिल्ह्यातील राईस मिल मालकांनी गत दाेन आठवड्यापासून पणन महासंघासाेबत असहकार पुकारला आहे. धान भरडाईचे डीओ उचलण्यास नकारघंटा दिली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत चर्चा हाेऊनही काेणताच ताेडगा निघाला नाही. परिणामी, जिल्ह्यातील सर्व गाेदाम फुल्ल झाले आहेत. धान खरेदी जवळपास ठप्प झाली आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांना त्याचा माेठा फटका बसत आहे. याबाबत तात्काळ ताेडगा काढण्याची गरज आहे. मात्र तूर्तास तरी तिढा कायम आहे.
रास्ता राेकाेचा इशारा
लाखांदूर तालुक्यात १४ आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. मात्र एकाही केंद्राला उचल आदेश अर्थात डीओ दिला नाही. त्यामुळे उघड्यावर धान खरेदी सुरू आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २७ जानेवारी राेजी बारव्हा फाटा येथे रास्ता राेकाे आंदाेलनाचा इशारा चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी दिला आहे.