पालांदूर : वीजबिल थकीतच्या कारणाने संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील गाव लाइन अर्थात, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू झाले आहे, ते थांबवावे. थकीत असलेले बिल जिल्हा परिषद विभागाने भरावे. आतापर्यंत शासकीय धोरणाच्या अधीन राहून जिल्हा परिषद ने बिल भरलेले आहे. थकीत वीजबिलाचा कारण पुढे करीत गाव खेडी अंधारात टाकू नका, तोडलेली वीज पुन्हा जोडा, अशा अपेक्षेची निवेदन सरपंच संघटना तालुका लाखनीच्या वतीने अभियंता महावितरण, खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष म.वा. बोळणे, नरेंद्र भांडारकर, प्रशांत मासुरकर, सरपंच कल्पना सेलोकेर, सरपंच संगीता घोनमोडे, मनोहर बोरकर, जगदीश भोयर, विना नागलवाडे, देवनाथ निखाडे, सरपंच परसराम फेंडर, सुमेध मेश्राम, सरपंच रसिका कांबळे, सरपंच सुधाकर हटवार यासह लाखनी तालुक्यातील बहुसंख्येने सरपंच उपस्थित होते.
गावातील पथदिव्यांचे बिल नियमितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद विभाग भरत आलेला आहे. गावच्या ग्रामपंचायतीची तिजोरी रिकामी असल्याने पथदिव्यांचे बिल भरणे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या बाहेर आहे. हे वास्तव अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. वास्तविक, तिचा आधार घेत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका गावखेड्यातील जनतेला बसू नये. शासन स्तरावर थकीत बिलाचा पुनर्विचार व्हावा. राज्यशासनाने सुद्धा यात मध्यस्थी करीत गावच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. अशा रास्त अपेक्षांचे निवेदन सरपंच संघटना तालुका लाखणी यांनी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
गावच्या ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीकरिता १५व्या वित्त आयोगातून गावात सौरऊर्जेच्या माध्यमातून गावलाइन स्वयंभू करावी. १५वा वित्त आयोगाच्या पार्श्वभूमीवर गावात योग्य ते नियोजन करीत ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीनेही अपेक्षित सहकार्याची अपेक्षा केली आहे.