लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असताना आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. या लाटेत सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची शंका वर्तविली जात आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका, त्यांची विशेष काळजी घ्या, लक्षणे आढळल्यास तात्काळ टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन शहरातील बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. मृतांचे प्रमाणही वाढले होते. आता दुसरी लाट ओसरु लागली असून लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेेचे आहे. कारण लहान मुलांना कोरोना झाल्यास त्याच्यासोबत घरातील कुणालातरी रुग्णालयात राहावे लागेल आणि त्यातून पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे.
बाल रुग्णांसाठी २० खाटांचे डेडीकेट केअर युनिट
संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सकांसह शहरातील बालरोग तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष वाॅर्ड तयार करण्यात आले आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता २० खाटांचे डेटीकेड केअर युनिट लवकरच उभारले जाणार आहेत तसेच इतर वाॅर्डातही सुविधा राहणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निखिल डोकरीमारे यांनी दिली
लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी
सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास तात्काळ टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांना गर्दीत घेऊन जाऊ नये. घरात कुणी कोरोनाबाधित असेल तर त्याला लहान मुलांपासून दूर ठेवावे. विशेष करुन आईने ही काळजी घ्यावी.-डाॅ.सुनील जिभकाटे, बालरोग तज्ज्ञ
संभाव्य तिसऱ्या लाटेपर्यंत १८ वर्षावरील बहुतांश व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल. तर १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण होणार नाही. त्यामुळे या वयोगटातील बाळांना कोरोनाचा अधिक धोका संभावतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.-डाॅ.शशांक क्षीरसागर, बालरोग तज्ज्ञ
शक्यतो लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. व्हिटॅमिन सी, डी अथवा व्हिटॅमिन बी काॅम्प्लेक्स सायरप द्यायला हरकत नाही. फिजीकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीचा वापर करुन बालकांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.-डाॅ. अमित कावळे, बालरोग तज्ज्ञ