जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिक स्वेच्छेने गर्दी करीत आहेत. मात्र मद्यप्राशना संदर्भात संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मद्यपान करावे, लसीकरण व मद्यपान याचा फारसा संबंध नाही, तसेच या संदर्भात ठोस अशा मार्गदर्शक सूचना नसल्याचेही अनेकांनी सांगितले. मात्र मद्यसेवनाचे शरीरावर विपरीत परिणाम होतात. यामुळे कोरोना परिस्थितीत तरी अनेकांनी मद्यपान टाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना लसीकरणामुळे रोगप्रतिकार क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र अति मद्यपान सेवनाने यामध्ये बाधा येण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मद्यसेवन सध्यातरी टाळलेलेच बरे असा सल्ला सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून दिला जात आहे. मात्र असे असले तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात बहुतांश जण मद्य प्राशन करीत असल्याचेच चित्र दिसून येत आहे.
बॉक्स
मद्यप्राशन आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच
मद्यसेवन अथवा कोणतेही मानवाला असलेले व्यसन हे आरोग्याच्या दृष्टीने घातकच असते. अनेक जण कॉलेज वयात मित्रांच्या आग्रहाखातर किंवा शौक अथवा आकर्षण म्हणून मद्यसेवन करतात. कधी कधी पार्टीच्या रूपाने अनेक जण मद्यसेवन, सिगारेट ओढतात, मात्र कालांतराने हीच सवय जडली जाते आणि मद्यसेवनाच्या आहारी गेल्याने अनेकांना कालांतराने दररोज मद्यप्राशन करण्याची सवय लागते. त्यामुळे कोरोनाच्या काळात तरी मद्यप्राशन करणे टाळावे असे तज्ज्ञांचे मत आहे. गतवर्षी लॉकडाऊन कालखंडात दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र पुन्हा ही दारूची दुकाने सुरू होताच अनेकांनी दुकानांसमोर रांगा लागल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र सध्या राज्यात वाढलेला संसर्गाचा प्रादुर्भाव आणि जिल्ह्यात मृतांचा आकडा पाहिल्यास सध्यातरी मद्य शौकिनांनी मद्य सेवन करू नये, असेच सांगितले जात आहे.
कोट
कोरोना लसीकरणानंतर मद्यपान करावे अथवा करू नये याबाबत शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना अथवा आदेश नाहीत. मात्र मानवी आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास मद्यपान किंवा मद्याचे अतिसेवन आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे. प्रत्येकानेच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.
डॉ. प्रशांत उईके,
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा
मार्च महिन्यात विक्री झालेली दारू विक्री
देशी दारू ०९ लाख ९० हजार ८१३ लिटर
विदेशी दारू ०१ लाख ९६ हजार ४०२ लिटर
बीअर १ लाख ४५ हजार ८४० लिटर
वाईन २,५२८