मुखरू बागडे
पालांदूर
झाडीपट्टी लोककला अख्ख्या भारत भूमीत सुपरिचित आहे. लोकांच्या पसंतीला उतरलेले नाटक आता सोशल मीडियावरही धूम ठोकत आहे. आधारभूत उन्हाळी धान खरेदी हंगाम शेतकऱ्यांकरिता कसा फोल ठरत आहे, याचे एकपात्री नाटकातून वास्तव चित्र व्यथित शेतकरी अशोक मस्के महागाव शिरोली, ता. अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया यांनी अभिनयातून चित्रीकरण केले आहे. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड धूम करीत आहे. शेतकऱ्याची व्यथा सरकार व त्याचे प्रशासन ओळखून आहे. ‘हाडाचे मणी व रक्ताचे पाणी’ करीत कोरोनाचे संकट उरी बाळगत उन्हाळी हंगाम कसला. घामाच्या धारा वाहत धान पीक घेतले. महागाईच्या संकटाने गरजेपेक्षा अधिक पदरचे पैसे खर्च करीत स्वतःच्या आयुष्यात परीस ठरलेला धान आज कुणी घ्यायला तयार नसल्याने शेतकरी हतबल आहे.
आधारभूत केंद्र केवळ कागदावर दिसत असून, प्रत्यक्षात मात्र केंद्रावर खरिपाचेच धान पडून आहे. लोकप्रतिनिधी पोकळ प्रतिष्ठेसाठी धान खरेदी केंद्र सुरू केले असल्याचे भासवतात. अधिकाऱ्यांवरही अवास्तव दबाव टाकून खरेदी केंद्राचे फीत कापण्याचे काम सुरू आहे. फीत कापल्यानंतर आशावादी शेतकरी दररोज केंद्रावर भेट देत आहे. तलाठ्याकडून सातबारा घेत ऑनलाइनसाठी खरेदी केंद्रावर हजेरी लावतो. आज होईल, उद्या होईल या आशेने पूर्ण मे महिना लोटला. मात्र, आधारभूत केंद्र अजूनही आशावादी दिसत नाही.
खासगी व्यापारी मात्र स्वतःचे उखळ पांढरे करीत शेतकऱ्याच्या अगतिकतेचे सोने करीत आहे. शेतकरी धानाला आयुष्याचा परीस समजतो आहे. सिंचित क्षेत्रातील शेतकरी दोन्ही हंगामांत धान पिकवितो आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात बऱ्यापैकी सिंचित क्षेत्र तयार आहे. दरवर्षी सिंचित क्षेत्राचे प्रमाण वाढत आहे. आधारभूत केंद्र शेतकऱ्यांना वरदान ठरलेले आहे; परंतु उदासीन लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणाने शेतकऱ्यांच्या आयुष्यातील परीस ठरलेले धान आधारभूत केंद्रावर विकता येईना झाले आहे. १८६८ रुपये दराचे धान १२५० रुपयापर्यंत विक्री करावे लागत आहे. हे चित्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा बघत असूनही भावनाशून्य कृती करीत वेळ मारून नेत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याला कारण शासनाचे चुकीचे धोरण ठरत असल्याची बोलकी कलाकृती एकपात्री नाटकाच्या माध्यमातून व्यथित शेतकरी अशोक मस्के यांनी मांडली आहे.