संजय साठवणे
साकोली (भंडारा) : वय वर्ष ७४, शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत, प्रकाशित पुस्तके ५८, प्रकाशनाच्या वाटेवर १२ पुस्तके आणि १३ पुरस्कार. याही पलीकडे सांगायचे झाल्यास समाजसेवा, व्यसनमुक्ती, धार्मिक क्षेत्रात अविरत कार्य. एवढेच नाही तर झाडीबोली चळवळीत साहित्य सेवाही. ही कामगिरी पाहून आपणास निश्चितच धक्का बसला असेल. मात्र, कुठल्याही प्रकाशझोतात नाही. बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्व आहे सोकाेली तालुक्यातील उमरी येथील संतकवी डोमा कापगते यांचे.
सामान्यत: उच्च शिक्षण झालेला माणूस विद्वान असतो आणि अल्पशिक्षित माणूस कमी बुद्धीचा, असा अनेकांचा समज असतो. मात्र, हा समज काढून टाकायला भाग पाडणारी काही व्यक्ती आपल्यात असतात. त्यातीलच एक म्हणजे डोमा कापगते होय. दोन-चार पुस्तके इकडून तिकडून प्रकाशित करून स्वतःला साहित्यिक, कवी आणि लेखक म्हणून मिरवणाऱ्यांवर निश्चितच या सरस्वती पुत्राने मात केली आहे.
डोमाजी यांचे जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झाले. भजनावली, लेखसंग्रह, काव्य, कथा, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, अध्यात्म, वैचारिक यांसारख्या विषयांवर आतापर्यंत तब्बल ५८ पुस्तके प्रकाशित झाली. १२ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. विविध क्षेत्रातून आतापर्यंत प्राप्त झालेले १३ पुरस्कार ही त्यांच्या साहित्य सेवेची पावती होय.
साधू वृत्तीने लोकोत्तर कार्य
झाडीबोली चळवळीतील अनेक विद्वान साहित्यिक मंडळींची संगत डोमाजी यांना लाभली आहे. धोतर कुर्ता व डोक्यावर पांढऱ्या टोपीवर फेटा अशा जुनाट पेहरावात ते दिसतात. साधू वृत्तीने अविरत लेखन आणि समाजसेवा करून त्यांच्या हातून लोकोत्तर कार्य होत आहे. १९७५ पासून पत्नी इंदिराबाई यांच्या आग्रहातून सुरू झालेला हा शब्द साधकाच्या लेखणीचा निर्मळ झरा आज पंचाहत्तरीत पोहोचेपर्यंत अद्यापही झुळझुळ वाहत आहे.
अशी आहे पुरस्कारांची यादी
संत कवी डोमा कापगते यांच्या पुरस्कारांच्या यादीत साहित्य पुरस्कार, ना.रा. शेंडे कथा, ग्रामदूत, समाजरत्न, समाज सेवक, साहित्य सेवा, समाज प्रबोधन, काव्य लेखन, उत्कृष्ट प्रबोधन, सुभाष चांदूरकर पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक, संत लहरी भूषण पुरस्कार अशा कितीतरी पुरस्कारांचा समावेश आहे. सन २०१० मध्ये झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले.