जिल्ह्यात फक्त दोन रक्तपेढी आहे. यात भंडारा शहरातील समर्पण ब्लड बँक व जिल्हा रुग्णालयात असलेली रक्तपेढीचा समावेश आहे. कुणालाही रक्ताची आवश्यकता भासल्यास या दोन ठिकाणांहून रक्त उपलब्ध केले जाते. दुर्मीळ रक्तगट असलेली व्यक्ती किंवा डोनर वेळेवर उपलब्ध झाली नाही, तर मोठा पेचप्रसंग निर्माण होतो. अशा वेळी नागपूरलाही धाव घ्यावी लागते. कोरोना काळात अशी परिस्थीती निर्माण होऊ नये, म्हणून लस घेण्यापूर्वी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी समोर यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
‘त्या’ रक्तपिशवींचा अभाव
रक्तामध्ये एबी निगेटिव्ह हा रक्तगट सगळ्यात दुर्मीळ रक्तगट म्हणून ओळखला जातो. वेळप्रसंगी या गटातील रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा मृत्यूही झाल्याची घटना घडल्या आहेत. ओ, एबी पाॅझिटिव्ह यांसह काही रक्तगटातील रक्त सहजपणे उपलब्ध होते. मात्र, दुर्मीळ रक्तगटातील रक्त व डोनर मिळत नाही. कोरोना काळात लसीकरण झाल्यानंतर रक्ताची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे कुठल्याही रक्तगट असलेल्या सुदृढ व्यक्तीने रक्तदानासाठी स्वेच्छेने समोर यावे, अशी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे रक्ताचा तुटवडा होऊ नये, हा यामागील उदात्त हेतू आहे. रक्तपेढीतून रोज सरासरी १५ रक्तपिशव्या रक्त दिले जाते. मात्र, डोनरची संख्या ३ ते ४ असते.
ब्लड बँक प्रमुख म्हणतात...
रक्तदान करणे हे शरीरस्वास्थासाठीही उत्तम बाब आहे. कोरोनाच्या काळात रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये किंवा टंचाई निर्माण होऊ नये, याची प्रत्येकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी समोर यावे.
-ओंकार नखाते, समर्पण ब्लड बँक, भंडारा
जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा आहे, पण तो लसीकरणामुळे नाही. कुठलीही नाॅर्मल व्यक्ती रक्तदान करू शकते. कोरोना काळात व आजघडीला रक्ताची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून रक्तदान होणे महत्त्वाचे आहे.
-डाॅ.मीरा सोनवाने, रक्तसंक्रमण अधिकारी जि.रुग्णालय
पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा, परंतु ६० दिवसांनंतरच त्या व्यक्तीला रक्तदान करता येऊ शकते. तत्पूर्वी त्याने रक्तदान केल्यास अतिउत्तम आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे. दररोज सरासरी एक हजार लस देण्यात येत असतात.