आगीमुळे वन्यप्रेमी व्यथित : आग विझविण्यासाठी वनविभागाच्या पथकाचा आटापीटाकरडी(पालोरा) : तुमसर वनविभागाच्या (प्रादेशिक) अंतर्गत कोका अभयारण्यालगत असलेल्या ढिवरवाडा गावाजवळील डोंगरदेव टेकडी येथील जंगलात भीषण आग लागली आहे. आज सायंकाळी अचानक आग लागल्याने आगीने रौद्ररुप धारण केले आहे. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत होते. याची माहिती वनविभाग प्रशासनाला देण्यात आली. ढिवरवाडा गावाजवळील डोंगरदेव टेकडी येथील जंगल निमर्णुष्य असे हे जंगल आहे. तुमसर, मोहाडी जिल्ह्यांच्या सरहद्दीत असणाऱ्या या जंगलालगत विविध जातींचे हिंस्त्र प्राणी, पक्षी, फुलपाखरे व सरपटणारे जीव जंतू आहेत. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगल संपदा असताना वनविभाग प्रशासन जंगलांना आगी लागू नयेत म्हणून कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. मात्र आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्याचा तकलादू प्रयत्न करतात. जंगलाला एकदा आग लागली की ती कित्येक दिवस जंगलाच्या परिसरात सुरुच असते. घनदाट जंगलात असणारे हिंस्त्र पशु पक्षी त्या आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत. त्यामुळे जंगलातील प्राण्यांची संख्याही कमी होत आहे.आज सायंकाळी डोंगरदेव टेकडी येथील जंगलाला अचानक आग लागल्याने आगीने रौद्ररुप धारण केले आहे. जंगलातील वन्यप्राणी सैरावरा पळून जीव वाचविण्यासाठी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र अनेकांनी पाहिले. जंगल वाचविण्यासाठी वन्यप्रेमींची धडपड दिसून आली. सध्या उन्हाळ्याची चाहुल सुरु आहे. अशावेळी वन्य प्राणी पाण्यासाठी तलावाच्या आसपास येतात. त्यांना या आगीमुळे धोका पोहोचतो. तर सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल सुरु आहे. जंगलात आगी लावणाऱ्यांवर कडक निर्बंध घालणे व जंगलाच्या शेजारील गावातील नागरीकांत प्रबोधन करुन आग लागुच नये यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. रात्री उशिरा तुमसर व कोका वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाच्यांची चमू आग आटोक्यात आणण्यासाठी गेले आहेत. (वार्ताहर)
डोंगरदेव जंगलात आग; वन्यप्राणी सैरभैर
By admin | Published: March 19, 2017 12:17 AM