लाेकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील कांद्री ते पांजरा रस्त्याचे इंग्रजाच्या काळापासून या रस्त्याचे खड्डीकरण झाले नसल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत राहत असते. त्यामुळे हा रस्ता पूर्णत: चिखलमय बनतो. या रस्त्याने परिसरातील नागरिकांना, शेतकरी व शाळकरी मुलांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या रस्ताचे त्वरित खड्डीकरण करण्याची मागणी कांद्री येथील माजी सरपंच शशिकांत नागफासे, महेश तुपट, माजी सोसायटी अध्यक्ष प्रभाकर बारई यांनी केली आहे.पांजरा हे गाव मोहाडी तालुक्यातील एकमेव ग्रामदान आहे. परंतु कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या ३०/५४ व ५०/५४ या हेड वरून मार्ग व रस्ते देखभाल व दुरुस्ती करता येते. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित कांद्री ते पांजरा रस्ताचे खड्डीकरण करण्याची मागणी कांद्री येथील शशिकांत नागफासे, महेश तुपट, माजी सोसायटी अध्यक्ष प्रभाकर बारई यांनी केली आहे.