वाहतुकीस अडथळा : सिमेंट कव्हरवरूनच वाहनांची वाहतूक, संत जगनाडे नगरातील प्रकार
तुमसर: नागरिकांच्या सोयीकरिता तुमसर नगरपरिषदेने संत जगनाडे नगर, हसारा रोड येथे कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम केले. रस्त्यालगत नालीवर सिमेंटचे काही ठिकाणी कव्हर बसविण्यात आले तर काही ठिकाणी कव्हर अद्याप बसविले नाही. हे कव्हर रस्त्यावरच पडून आहेत या कव्हरवरून ट्रॅक्टर व इतर वाहनांची वाहतूक सुरू असल्याने हे कव्हर तुटण्याची शक्यता आहे. मागील सहा महिन्यांपासून याकडे कंत्राटदार व नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.
शहरातील संत जगनाडे नगर, हसारा रोडवर नवीन वस्ती वसलेली आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या सोयीकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम केले. रस्त्यालगत असलेल्या नालीवर सिमेंटचे कव्हर काही ठिकाणी बसविण्यात आले, परंतु काही ठिकाणी अजूनपर्यंत सिमेंटचे कव्हर बसविण्यात आले नाही. हे सिमेंट कव्हर रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे या सिमेंट कव्हरवरूनच ट्रॅक्टर व इतर वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हे कव्हर तुटण्याची दाट शक्यता आहे. नाली वरील काही कव्हर न बसवल्याने येथील धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. नाली बंद असावी. नालीतील जंतू व सरपटणाऱ्या प्राण्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. अंधारात उघड्या असलेल्या नालीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. तसेच रस्त्यावर असलेल्या सिमेंट कव्हरमुळे सुद्धा नागरिकांना येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना काळात काम बंद पडले होते. त्यामुळे नालीवरील कव्हर बसविण्यास विलंब लागला. परंतु आता सर्वसामान्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे कव्हर नालीवर बसविण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. ट्रॅक्टर व इतर वजनदार वाहनांच्या वाहतुकीमुळे हे सिमेंटचे कव्हर तुटण्याची शक्यता असून पुन्हा नवीन कव्हर बनविण्याचा खर्च संबंधित यंत्रणेला करावा लागेल. त्यामुळे तत्काळ नालीवरील कव्हर बसवून येणारा खर्च टाळावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.